काँगेस नेते सलमान खुर्शिद यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाने मोठाच वाद निर्माण झाला आहे. ‘सनराईज ओव्हर अयोध्या- नेशनहुड इन अवर टाईम्स’ असे या पुस्तकाचे नाव. या पुस्तकात ‘हिंदुत्व’ या संकल्पनेची तुलना इस्लामी जेहादी आणि दहशतवादी गटांशी करण्यात आली आहे. या पुस्तकाविरोधात तक्रारही सादर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पुस्तकातील ‘द सॅफ्रॉन स्काय’ (भगवे आकाश) या प्रकरणात हिंदुत्ववाद आणि हिंदू विचारसरणीच्या विरोधात मानहानीकारक आरोप करण्यात आले आहेत. ‘सनातन धर्म आणि पारंपारिक हिंदुत्व, जे संत आणि साधूंनी अंगिकारले, ते आता मागे सारण्यात आले असून त्याचे स्थान आक्रमक हिंदुत्वाने घेतले आहे. हे हिंदुत्व राजकीय स्वरुपाचे असून ते आयएसआयएस आणि बोको हराम यांसारख्या जेहादी आणि धर्मांध इस्लामी गटांच्या विचारसरणीसारखे आहे’ अशा अर्थाची वाक्ये आणि आशय या पुस्तकाच्या काही भागांमध्ये आहे. मध्यप्रदेशातील एक विधीतज्ञ (कायदेपंडित) विनीत जिंदाल यांनी या पुस्तकाविरोधात आणि लेखक सलमान खुर्शिद यांच्या विरोधात तक्रार सादर केली आहे. शिवाय या पुस्तकाचा हेतू वादग्रस्तता निर्माण करणे हाच आहे, असा आरोपही होत आहे. या पुस्तकातील आशय कायद्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह आहे किंवा नाही, हे या तक्रारीवर कारवाई झाल्यानंतर न्यायालयात ठरेलच. तरीही प्रथमदर्शनी विचार करता या पुस्तकातील अशा प्रकारचा आशय आणि हिंदुत्व या विचारसरणीवर केलेले असे सरसकट आरोप निंदनीय आहेत, हे निश्चित. अद्याप या पुस्तकातील सर्व आशय ज्ञात झालेला नाही. तरीही, हिंदुत्वाची तुलना इस्लाममधील दहशतवादी विचारसरणीशी करुन लेखकाने या दोन्ही विचारसरणींसंबंधीचे स्वतःचे अज्ञान प्रकट पेले असा आरोप झाल्यास आश्चर्य वाटावयास नको. ‘हिंदुत्व’ ही एक व्यापक आणि काळनुरुप परिवर्तित होत जाणारी संकल्पना आहे. इतर काही धर्मांप्रमाणे ती ‘पुस्तकी’ आणि अपरिवर्तनीय (रिजिड) संकल्पना नाही. त्याचप्रमाणे हिंदुत्व या संकल्पनेत राजकारण त्याज्य मानण्यात आलेले आहे असेही नाही. साधुसंतांनी जे हिंदुत्व अंगिकारले आणि समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला ते आध्यात्मिक हिंदुत्व आहे. त्यात मानवाच्या आत्मिक उन्नतीला प्राधान्य देण्यात आले आहे. तथापि, याचा अर्थ असा नव्हे, की हिंदुत्व हे केवळ आध्यात्मिकच असते किंवा असावे. हिंदुत्व हे मानवी जीवनाच्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्व पैलूंना मार्गदर्शन करणारे आहे. उदाहरणार्थ, महाभारत हा ग्रंथ हिंदूंचा धर्मग्रंथच मानला जातो. या गंथात राजकारण, अर्थकारण, समाजकारण, अध्यात्म, राजसत्ता, राजसत्तेचे सर्वसामान्यांशी संबंध, राजकीय स्पर्धा, डावपेच, युद्धे, व्यक्तीगत आणि सामुहिक संघर्ष इत्यादी सर्व विषयांवरील प्रसंग असून त्यांवर भाष्यही करण्यात आले आहे. कारण जो पर्यंत आपण जिवंत आहोत, तो पर्यंत भौतिक आयुष्याशी आपली नाळ तुटू शकत नाही आणि हे भौतिक जीवन जगण्यासाठी ज्या क्रिया करणे आवश्यक असते, त्या कराव्याच लागतात. अगदी आध्यात्मिक प्रवृत्तीच्या माणसालाही त्याच्या व्यावहारिक आयुष्याचा विचार व्यावहारिक पद्धतीनेच करावा लागतो. हे तत्व ज्याप्रमाणे इतर धर्मियांना लागू आहे तसेच ते हिंदुत्व किंवा ती विचारसरणी मानणाऱयांनाही लागू आहे. त्यामुळे हिंदुत्व आध्यात्मिक असेल तरच ते खरे हिंदुत्व आणि ऊर्वरित हिंदुत्व, विशेषतः राजकीय हिंदुत्व हे बनावट किंवा त्याज्य अशी मांडणी करणे हेच खरेतर धूर्त राजकारण आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे तथाकथित विचारवंत हिंदुत्वाचे हे सर्वसमावेशकत्व लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंनी व्यापक हिंदुत्वाच्या सर्व पैलूंचा स्वीकार न करता, केवळ आध्यात्मिक हिंदुत्वच स्वीकारावे अशी त्यांची मतलबी इच्छा असते. मात्र, या इच्छेमागची त्यांची भूमिका ही हिंदुत्व किंवा हिंदू समाज यांच्या हिताची नसते. तर आपल्याशी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांकडून राजकीय स्पर्धा केली जाऊ नये, हा यामागचा अंतःस्थ हेतू असतो, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा हिंदू राजकीयदृष्टय़ा एककेंद्री होण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा लाभ एखाद्या हिंदुत्ववादी पक्षाला होण्यास प्रारंभ होतो, तेव्हा या तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारवंतांना हिंदुत्वातील अध्यात्माची आठवण होते. नंतर हे लोक हिंदूंना राजकीय हिंदुत्व कसे खरे हिंदुत्व नाहीच आणि आध्यात्मिक हिंदुत्व हेच कसे खरे हिंदुत्व आहे हे पटवून देण्याचा आणि हिंदूचा बुद्धीभेद करण्याचा जोरदार प्रयत्न करतात. मग राजकीय हिंदुत्वाची तुलना अन्य धर्मांमधील धर्मांध आणि दहशतवादी तत्वांशी किंवा गटांशी केली जाते. हिंदू समाजाच्या मनात राजकीय हिंदुत्वासंबंधी घृणा, भीती आणि तिरस्कार निर्माण व्हावा हा यामागचा कुटील हेतू असतो. मात्र, अलिकडच्या काळात सर्व नाही तरी पुष्कळशा हिंदूंच्या लक्षात हे ‘धर्मनिरपेक्ष’ डावपेच येऊ लागल्याचे दिसून येते. परिणामी हे डावपेच फारसे प्रभावी ठरताना दिसत नाहीत. धर्मात राजकारण मिसळू नका, असा उपदेश केवळ हिंदूंनाच का केला जातो ? हा देखील महत्वाचा प्रश्न यासंदर्भात विचारण्याजोगा आहे. धर्मात राजकारण येऊ न देणे किंवा धर्म केवळ स्वतःच्या मनात किंवा घरात किंवा केवळ धार्मिक क्रियाकर्मांपुरता मर्यादित ठेवावा, ही अट फक्त हिंदूंसाठीच का आहे ? इतर धर्मांचे नेते, धर्मगुरु, इतकेच नव्हे तर सर्वसाधारण नागरीकदेखील धर्म हे राजकीय आयुध म्हणून उपयोगात आणत नाहीत काय ? आपले धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे राजकीय पक्ष हिंदू वगळता इतर धर्मियांच्या ‘एकगठ्ठा’ मतदानावर अवलंबून असत नाहीत काय ? तशा प्रकारचे अप्रत्यक्ष (काहीवेळा प्रत्यक्षही) आव्हान त्यांच्याकडून पेले जात नाही काय ? या प्रश्नांची उत्तरे या धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱयांना द्यावी लागतील. त्यानंतरच त्यांना राजकीय हिंदुत्वाला विरोध करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होईल. पण त्यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा धरता येत नाही. कारण खरी उत्तरे देणे त्यांना अशक्यच आहे.
Previous Articleआजचे भविष्य 12-11-2021
Next Article कंगना म्हणते फटाके फोडा
Related Posts
Add A Comment