जिल्हाधिकाऱयांनी पाठवलेल्या अहवालावर कार्यवाही सुरू
प्रतिनिधी/ चिपळूण
नगर परिषदअंतर्गत झालेल्या विविध कामांतील अनियमिततेबाबत महाविकास आघाडीच्या 18 नगरसेवकांनी चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याविरोधात केलेली तक्रार, त्याची चौकशी करून जिल्हाधिकाऱयांनी सादर केलेला अहवाल यावर आता नगर विकास विभागाने कार्यवाही करत नगराध्यक्ष खेराडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 15 दिवसात खुलासा मागवला आहे.
खेराडे यांनी आजपर्यंत केलेल्या कामांपैकी 13 कामांवर 18 नगरसेवकांचा आक्षेप असून त्याची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे काही वर्षापूर्वी केली होती. यावर गेल्या काही महिन्यांत अनेक सुनावण्या झाल्या व तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार आता नगर विकास विभागाने नगराध्यक्षा खेराडे यांना नोटीस काढली आहे.
समितीने काढलेल्या निष्कर्षानुसार, नगर विकास खात्याने नगराध्यांकडे खुलासा मागवला आहे. यामध्ये कामे वेळेत पूर्ण न झाल्याने ठेकेदारावर कारवाई न करणे, 58 (2) नुसार हाती घेतलेली कामेही पूर्ण न झाल्याने तातडीची बाब सफल न होणे, वाढीव कामांची निविदा प्रसिध्द न करता तसेच विहित कार्यपध्दती न अवलंबता, पूर्वीच्याच ठेकेदारास कामे देऊन अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपकाही ठेवला गेला आहे. एलईडी स्ट्रीटलाईट खरेदीमध्येही ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करून लेखा परीक्षण अहवालातील निष्कर्षानुसार 30.73 लाखाची वसुली न करणे, उक्ताड पार्कींग भाग 1 विकसित करताना 24.95 लाखाच्या कामाची स्वतंत्र निविदा प्रसिध्द न करताच त्याच ठेकेदाराला चुकीच्या पध्दतीने ठराव पारीत करून काम देण्याची बाब नगर परिषद अधिनियमाचा भंग करणारी असून कर्तव्यात कसूर केल्याच्या समितीच्या अहवालावरून दिसत असल्याचे यात म्हटले आहे.
नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत या संदर्भातील बचावाचा लेखी खुलासा शासनास सादर करावा. खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काहीही म्हणणे नसल्याचे गग्नृहित धरून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही या नोटीसीमध्ये म्हटले आहे. नगराध्यक्षा खेराडे या नोटीसीवर काय खुलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
…