श्रीराम मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रम : रामभक्तांचा अमाप उत्साह : धनगरी ढोलवाद्यांच्या गजरात मिरवणूक : दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
गुलाल उधळूनी नगर रंगले
भक्तगणांचे थवे नाचले
राम भक्तीचा गंध दरवळी
गुढय़ा तोरणे घरोघरी
प्रभू आले मंदिरी
याचे प्रत्यंतर देत शहर परिसरात सश्रद्ध भावनेने रविवारी रामनवमी साजरी झाली. शहरातील राम मंदिरांतून धार्मिक कार्यक्रम झाले. विशेषतः आचार्य गल्ली गाडेमार्ग, शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिर, बिच्चू गल्ली शहापूर, रामदेव गल्ली येथील श्रीराम देवस्थान, केळकरबाग येथील श्रीराम मंदिरात अभिषेक, महापूजा, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले होते. राम मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. यंदा भक्तांच्या अमाप उत्साहात रामनवमीचा उत्सव साजरा झाला.
शहापूर लोकमान्य श्रीराम मंदिर

आचार्य गल्ली गाडेमार्ग शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात कार्यक्रम झाले. सकाळी सुबोध गावडे यांनी सपत्निक पूजन केले. पहाटे काकड आरती, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारी 12 वा. जन्मसोहळा, पाळणा झाला. महाआरतीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. गत दोन वर्षांत रामनवमी साधेपणात झाली होती. यंदा उत्साहात आणि भक्तांच्या उपस्थितीत साजरी झाली. मंडोळी येथील हभप मारुती पाटील महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत वैदिक मंत्र होऊन सांगता झाली. वर्क इन काँपोझिशनच्या सुमय्या व अन्य कार्यकर्त्यांनी गाडेमार्ग शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन फळांचे वाटप केले.
बिच्चू गल्ली, शहापूर श्रीराम देवालय

येथील श्रीराम देवालयात रविवारी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहाटे काकडारती, सकाळी 8 वा. पंचामृत, महाअभिषेक, सकाळी 10 ते 12 महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, त्यानंतर 12 वा. रामजन्मोत्सव सोहळा झाला. यामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर 4 ते 5 या वेळेत भक्तिगीतांच्या कार्यक्रमामध्ये महिला युवक मंडळाचा सहभाग होता. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत राम नाम जप करण्यात आला. तर 6 ते 7 या वेळेत महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. रात्री मंत्रपुष्प होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
रामदेव गल्ली, श्रीराम देवस्थान

येथील श्रीराम देवस्थानात रामनवमी उत्साहात साजरी झाली. सकाळी महाअभिषेक, पुष्पार्चन, तुलसीआर्चन, विष्णू सहस्त्रनाम व पूजा झाली. दुपारी 12 वा. जन्मोत्सव पाळणा झाला. रात्री 9 वा. महाआरती झाली. दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.
केळकर बाग, श्रीराम मंदिर

येथील सद्गुरु श्री काणे महाराज यांच्या श्रीराम मंदिरात रविवारी रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी 6 ते 10 अखंड नामस्मरण झाले. शिवाय 8 ते 10 या वेळेत अध्यात्म रामायण वाचन झाले. दुपारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा झाला. पुणे येथील हभप पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सतीश जोशी, ट्रस्टी सुभाष आजरेकर यांच्यासह काणे महाराजांची नात सून नंदिनी ओक उपस्थित होत्या.
कुरबर गल्ली, अनगोळ
कुरबर गल्ली, अनगोळ येथील जय अमर शिवाजी युवक मंडळातर्फे रविवारी धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी मूर्ती पूजन व जन्मोत्सव पाळणा झाला. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सोमवारी सायंकाळी 6 वा. महाआरती व भजन तर मंगळवारी सकाळी सत्यनारायण पूजा व सायंकाळी 8 वा. महाप्रसाद वितरण केले जाणार आहे.
कुरबर समाज, शहापूर

शहापूर येथील कुरबर समाजातर्फे रामनवमीनिमित्त धनगरी ढोलवाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दरवषीप्रमाणे गोवावेस, कोरे गल्ली, हट्टीहोळी गल्ली, नार्वेकर गल्ली, हिंदवाडी आदी भागात धनगर समाजाच्या ढोलचा दणदणाट झाला.
श्रीनगर, साई मंदिर

श्रीनगर येथील साई मंदिरात रामनवमी व साई जयंतीनिमित्त सकाळी पूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी 3 हजार हून अधिक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
टिळकवाडी, श्री साई मंदिर

टिळकवाडी येथील श्री साई मंदिरात दुपारी 12 वा. रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी साईबाबांच्या मूर्तीवर व गाभाऱयात द्राक्षांची आरास केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले.