प्राध्यापिका ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास
वृत्तसंस्था /टय़ूनिश
टय़ुनीशियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नजला बौडेन रोमधाने यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी यापूर्वीच्या पंतप्रधानांना बडतर्फ केल्यावर एका अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी इंजीनियरिंग स्कुलच्या 63 वर्षीय प्राध्यापिकेची निवड केली आहे. रोमधाने यांना बुधवारी नवे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देशात तीव्र असंतोष असताना त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे.
रोमधाने या नॅशनल स्कुल ऑफ इंजिनियर्समध्ये जियोलॉजीच्या प्राध्यापिका आहेत. उच्चशिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन मंत्रालयाने यापूर्वी त्यांना जागतिक बँकेसोबत मिळून कार्यक्रम लागू करण्याची जबाबदारी सोपविली होती. 2011 मध्ये त्यांना उच्च शिक्षण मंत्रालयात महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आले होते.
टय़ुनीशियाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारचे नेतृत्व महिला करणार आहे. रोमधाने यांच्यासोबत मिळून दृढ इच्छाशक्ती तसेच संकल्पासह काम करू, जेणेकरून अनेक सरकारी संस्थांमधील भ्रष्टाचार आणि अराजकता संपविता येईल असे उद्गार राष्ट्रपती कैस सईद यांनी काढले आहेत. 2014 च्या घटनेनुसार रोमधाने यांच्याकडे तुलनेत कमी अधिकार असतील.