मार्च तिमाहीमधील नफा कमाईची आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ मुंबई
औषध क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी डॉ. रेड्डीज लॅब या कंपनीला वर्ष 2020-21 मधील चौथ्या तिमाहीत नफा कमाई झाल्याची नोंद केली आहे. कंपनीने जानेवारी ते मार्च या कालावधीत जवळपास 553.5 कोटी रुपयाचा नफा प्राप्त केल्याची माहिती आहे. मागील वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा 28 टक्क्यांनी कमी राहिला असल्याची माहिती आहे.
कंपनीचा एकत्रित महसूल 6.7 टक्क्यांनी वाढून 4,728 कोटी रुपयावर पोहोचला आहे. कंपनीला भारत आणि युरोपियनमधील व्यवसायाचा हातभार लाभला आहे. एक्सचेंज फायलिंगच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21मध्ये एकत्रित नफा 1.8 घसरुन 1,914.9 कोटी रुपयावर राहिला आहे. साधारणपणे महसूल वाढ 8.7 टक्क्यांनी वाढून 18,972.2 कोटी रुपयावर राहिली आहे.
कंपनीचा जागतिक जेनरिक व्यवसाय हा 6 टक्क्यांनी वधारुन 3,873.7 कोटी रुपयावर राहिला आहे. भारतामध्ये हा आकडा मागील वर्षात 23 टक्के आणि युरोपमध्ये 15 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच महत्त्वाच्या विकसित बाजारपेठांमध्ये कंपनीचा वर्षाच्याआधारे व्यवसाय हा 10 टक्क्यांनी वाढल्याची नोंद केली आहे.
कंपनीची नवी सहा उत्पादने कॅनडामध्ये सादर
चौथ्या तिमाहीत कंपनीने कॅनडामध्ये सहा नवीन उत्पादने सादर केली आहेत. यामध्ये विगाबॅट्रिन टॅबलेट्स, फेबुक्सोस्टेट टॅबलेट्स, लॅसोप्रजोल ओडी टॅबलेट आणि बायरेटेरोन एसेटेट आदी उत्पादनाचा समावेश राहिला असल्याची माहिती आहे.