फ्लॅटवर सीसीबी पोलिसांचा छापा : आणखी एका अभिनेत्रीला अटकेची भीती
प्रतिनिधी/ बेंगळूर
कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेकलाकार अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे आढळून येत असल्याने बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी कारवाईसाठी व्यापक प्रमाणात जाळे पसरले आहेत. शुक्रवारी सकाळी कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. अमली पदार्थ प्रकरणात तिचा सहभाग असल्याचे आढळून येताच तिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी एक अभिनेत्री संजना हिला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे तिच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.
अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पत्रकार आणि दिग्दर्शक इंद्रजित लंकेश आणि डग्ज टोळीची प्रमुख अनिका यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सीसीबी पोलिसांनी तपासाची चपे गतिमान केली आहेत. अभिनेत्री रागिणी द्विवेदीचा मित्र रविशंकर आणि अभिनेत्री संजना हिचा मित्र तसेच रियल इस्टेट उद्योजक राहुल यांना अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. अमली पदार्थ पुरविणाऱया टोळीशी त्यांचा संपर्क असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राहुलच्या अटकेनंतर संजनालाही चौकशीसाठी हजर होण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.
सीसीबी पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झालेल्या अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिला कोणत्याहीक्षणी अटक होण्याची भीती असल्याने तिने वकिलांमार्फत एनडीपीएस न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सदर याचिकेवर सुनावणी करून 7 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे. दरम्यान, अमली पदार्थ सेवनामध्ये तिचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीतून आढळून आल्याने तिला सायंकाळी सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरोधात कॉटनपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रागिणीचा मित्र रविशंकर हा बेंगळूरच्या जयनगर आरटीओ कार्यालयात द्वितीय श्रेणी कारकून म्हणून काम करतो. ड्रग्ज प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ आणि इतर माहितीच्या आधारे तो ड्रग्ज पुरवठा करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे रागिणीला गुरुवारी सीसीबी पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली होती. शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता तिच्या यलहंका येथील अपार्टमेन्टमधील दोन फ्लॅटवर सीसीबीच्या अधिकाऱयांनी छापा टाकला. चार तास झडती घेतल्यानंतर तिच्याजवळील चार मोबाईल, लॅपटॉप, अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. अधिक चौकशीसाठी तिला तब्यात घेऊन चामराजपेठ येथील सीसीबीच्या मुख्य कार्यालयात नेण्यात आले.