मात्र कोरोना निर्बंधामुळे मुंबईला रवाना
प्रतिनिधी /वास्को
कॉर्डिला इम्प्रेस हे आंतरराष्ट्रीय फिरतीवरील पर्यटक जहाज काल रविवारी सकाळी 1500 पर्यटकांसह मुरगाव बंदरात दाखल झाले. या जहाजाने गोव्याच्या प्रुझ पर्यटन हंगामाला सलामी दिली. गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधीच हे पर्यटक जहाज दाखल झालेले असून येत्या 1 ऑक्टोबरपासून प्रुझ पर्यटन हंगामाला गती येणार आहे.
कॉर्डिला इम्प्रेस हे आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज रविवारी 1500 पर्यटक आणि 600 खलांशांसोबत मुरगाव बंदरात दाखल झाले. त्यामुळे एक प्रकारे प्रुझ पर्यटन हंगामाची सुरवात झालेली आहे.
मुरगाव बंदरात जोरदार स्वागत
एमपीटीचे उपाध्यक्ष जी. पी. राय, वाहतूक व्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत, कॅप्टन मनोज जोशी तसेच जे. एम. बक्षी कंपनीचे कॅप्टन सुशिल माथूर, वरिष्ठ व्यवस्थापक गोविंद पेरनुलकर यांनी या जहाजाचे मुरगाव बंदरात स्वागत केले. 2020 मार्चमध्ये शेवटचे पर्यटक जहाज गोव्यात येऊन गेले होते. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट सुरू झाली होती. त्यामुळे प्रुझ पर्यटन व्यवसाय बंद झाला होता. रविवारपासून या हंगामाला पुन्हा सुरवात झाली.
जहाज पुन्हा मुंबईला रवाना
कॉर्डिला इम्प्रेस हे पर्यटक जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले तरी कोविडसंबंधीत निर्बंध सरकारने अद्याप पूर्णपणे हटवलेले नसल्याने काही मोजकेच पर्यटक जहाजातून खाली उतरले व त्यांनी भ्रमंती केली. मुंबईहून गोव्याकडे आलेले हे जहाज संध्याकाळी पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
गोव्यातून 75 प्रवासी या जल सफरीवर रवाना झाले. हे जहाज पर्यटन हंगामात एकूण 58 वेळा मुरगाव बंदराला भेट देणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून प्रुझ पर्यटनामध्ये वाढ होणार असून बंदरातील प्रुझ धक्क्यावर संगीताचा खास कार्यक्रमही होणार आहे.