आरोग्य मंत्रालयाची माहिती , 24 तासांमध्ये 35 रूग्णांचा मृत्यू, रूग्णसंख्या 9 हजार 152वर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गामुळे सोमवारी सायंकाळी चारपर्यंतच्या चौवीस तासांमध्ये नवे 796 रूग्ण असल्याची नोंद झाली आहे. तर उपचार सुरू असणाऱया 35 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशातील रूग्णसंख्या 9152 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

25 जिल्हय़ांमध्ये 14 दिवसांमध्ये एकही नवा रूग्ण नाही
लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणू संसर्ग बाधित रूग्णांची संख्या मर्यादित राहिली आहे. देशभरातील जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाही प्रभावी ठरत आहेत. 15 राज्यातील 25 जिल्हय़ांमध्ये सुरूवातीच्या काळात कोरोनाबाधित रूग्ण आढळले होते. आता मागील 14 दिवसांच्या काळात या भागात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
857 रूग्ण पूर्ण बरे
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रूग्ण असून यामध्ये आणखी 82 रूग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये मुंबईतील 59 जणांचा समावेश आहे. त्या खालोखाल राजस्थानमध्ये 43 नवे रूग्ण आढळले. आतापर्यंत 857 रूग्ण पूर्ण बरे झाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.
देशभरात कोरोनाच्या दोन लाख सहा हजार 212 रूग्णांची चाचणी घेण्यात आली. पुढील सहा आठवडय़ापर्यंत चाचणी करण्यासाठीची साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत, अशी माहिती ‘आयसीएमआर’चे के. रमन आर गंगाखेडकर यांनी दिली. लॉकडाऊन काळात नागरिकांकडून स्वयंशिस्तीचे पालन होण्यासाठी सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व अन्य विभागांच्या अधिकारी देशभरात पोलिसांच्या मदत करत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
