ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे उद्गार : जगभरात 40,30,053 कोरोनाबाधित
जगभरात आतापर्यंत 40 लाख 30 हजार 053 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या महामारीमुळे 2 लाख 76 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 लाख 94 हजार 965 बाधितांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सरकारने निर्बंध हटविण्याची योजना आखण्यास प्रारंभ केला आहे. देशाला खुले करण्याची वेळ आली आहे. आम्ही तीन टप्प्यांमध्ये निर्बंध हटविणार आहोत. पहिल्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये तसेच छोटी दुकाने सुरू केली जातील. दुसऱया टप्प्यात 20 लोकांना एकत्र येण्याची अनुमती असणार आहे. तिसऱया टप्प्यात 100 लोकांसह आयोजन करता येणार असल्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केले आहे.
अर्जेंटीनात टाळेबंदी कायम

अर्जेंटीना सरकारने देशात 24 मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राजधानी ब्युनॉस आयर्स समवेत देशाच्या काही ठिकाणी निर्बंधांमध्ये सूट दिली जाणार आहे. अध्यक्ष एलबर्टो फर्नांनडेज यांनी याची घोषणा केली आहे. 20 मार्च रोजी देशात सर्वप्रथम टाळेबंदी लागू करण्यात आली होती.
व्हाइट हाउसचे दोन अधिकारी बाधित

अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय म्हणजेच व्हाइट हाउसमधील दोन अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्या माध्यम सचिव केटी मिलर तसेच इवांका ट्रम्प यांच्या सचिवाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्हाइट हाउसमधील सतर्कता वाढविण्यात आली आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन विभागाचे आयुक्त स्टीफन हॅन दोन आठवडय़ांसाठी स्वयंविलगीकरणात राहणार आहेत. मिलर यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत 13,22,164 रुग्ण सापडले असून 78,616 जणांचा बळी गेला आहे.
इटलीत 30 हजारांपेक्षा अधिक बळी

इटलीतील कोरोनाबळींचा आकडा 30,201 वर पोहोचला आहे. दिवसभरात 243 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत 21 फेब्रुवारी रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2,17,185 झाला आहे. तर 1,168 रुग्ण आयसीयूत दाखल झाले आहेत. तर 72 हजार 157 रुग्ण घरातच विलगीकरणाचे पालन करत आहेत. इटलीत अलिकडच्या काळात निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
चिनी पत्रकारांचा व्हिसा कालावधी घटविला

अमेरिकेने चिनी पत्रकारांचा व्हिसा कालावधी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी पत्रकार आता केवळ 3 महिन्यांसाठीच अमेरिकेचा व्हिसा प्राप्त करू शकणार असल्याची माहिती गृह सुरक्षा विभागाने दिली आहे. सद्यकाळात विदेशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अमेरिकेत कुठल्याही प्रकारचा कालावधी निश्चित नव्हता. परंतु नव्या दिशानिर्देशांनुसार चीनचे पत्रकार 3 महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत अमेरिकेत राहू शकणार आहेत.
ब्रिटनमध्ये 14 दिवसांचे विलगीकरण

ब्रिटनमध्ये विदेशातून येणाऱया लोकांसाठी 14 दिवसांचे क्वारेंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे. सरकारने सर्व एअरलाइन्सना या संबंधी निर्देश दिले आहेत. हा नवा नियम चालू महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात लागू होऊ शकतो. विदेशातून पोहोचणाऱया लोकांना स्वतःच्या घरात विलगीकरणाचे पालन करावे लागणार आहे. देशाच्या सीमेत प्रवेश करताच त्यांना स्वतःचा पत्ता नमूद करावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2,11,364 जणांना कोरोनाची लागण झाली असून 31,241 जणांना जीव गमवावा लागला आहे.
कुवेतमध्ये 3 आठवडय़ांसाठी संचारबंदी

कुवेतने संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 3 आठवडय़ांसाठी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी रविवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासुन सुरू होत 30 मेपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती सरकारचे प्रवक्ते तारेक अल-मेजरेम यांनी दिली आहे. या कालावधीत वाहनांच्या वापरावर बंदी राहणार आहे. परंतु लोक संध्याकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत घरानजीक व्यायाम करण्यासाठी बाहेर पडू शकतील. कुवेतमध्ये आतापर्यंत 7 हजार 208 बाधित सापडले असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे.
मॉस्कोत 1,010 बळी

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मागील 24 तासांमध्ये 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मॉस्कोतील एकूण मृतांची संख्या वाढून 1,010 वर पोहोचली आहे. मॉस्को शहर रशियातील केरोगा संसर्गाचे केंद्रबिंदू ठरले आहे. शहरात न्युमोनिया तसेच अन्य आजारांसह कोरोनाने ग्रस्त 54 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मॉस्कोच्या रिस्पॉन्स सेंटरने दिली आहे. रशियात 1,98,676 बाधित असून 1,827 जणांचा बळी गेला आहे.
ऑक्टोबरमध्ये वुहान प्रयोगशाळेत भयावह दुर्घटना

कोरोना विषाणूमुळे चीनच्या वायरोलॉजी इन्स्टीटय़ूटवर सर्वांची नजर आहे. या प्रयोगशाळेतूनच कोविड-19 महामारी फैलावल्याचा अमेरिकेला संशय आहे. चीनच्या वुहानमधील ही प्रयोगशाळा ऑक्टोबरमध्ये बंद करण्यात आली होती. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा याच्याशी संबंधित दस्तऐवजांची समीक्षा करत आहे. वुहान इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजीच्या अतिसुरक्षित क्षेत्रात 7 ते 24 ऑक्टोबरदरम्यान कुठलीच फोन ऍक्टिव्हिटी दिसून आली नसल्याचा दावा वृत्तसंस्थेने केला आहे. 6-11 ऑक्टोबर या कालावधीत वुहानच्या प्रयोगशाळेत दुर्घटना घडली असावी. प्रयोगशाळा पूर्णपणे बंद करण्याचे पुरावे मिळाले नसले तरीही कोरोना विषाणू तेथूनच जगात पसरल्याचे पुरावे मिळाले आहेत.