चुये / प्रतिनिधी
निगवे खालसा ता. करवीर येथून बेपत्ता झालेला युवकांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत ऊसाच्या शेतात आज, शुक्रवारी आढळला. प्रदिप लक्ष्मन पाटील (वय 28) असे या मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, 5 सप्टेंबर पासून प्रदिप हा घरातून न सांगता गेला होता. त्याची सर्वत्र शोधाशोध त्यांच्या कुंटूबियांनी केली होती. त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण पाटील यांनी मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलीसांत दिली होती. शुक्रवारी सकाळी गणपती भिकू पाटील यांच्या पड नावाच्या उसाच्या शेतामध्ये सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह पहायला मिळाला. घटनास्थळी इस्पुर्ली पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्रदीप लक्ष्मण पाटील यांचा मृतदेह असल्याचे निश्चित झाले. त्याचा मृत्यू कशाने झाला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलिसांत झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.