ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पाकिस्तानने कोविड-19 स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिम्सअंतर्गत दक्षिण आफ्रिका, रवांडा आणि टांझानियासह 12 आफ्रिकन देशांच्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. 23 मार्च ते 5 एप्रिल 2020 या कालावधीसाठी ही बंदी असणार आहे.
पाकिस्तानात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर पाकिस्तान नागरी हवाई प्राधिकरणाने अ, ब आणि क श्रेणीत विभागलेल्या देशांची नवी यादी अधिसूचित केली आहे. त्यामधील 12 क श्रेणीच्या देशांवर संपूर्ण प्रवास बंदी घातली आहे. तसेच ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरील बंदी शिथिल करण्यात आली आहे.
बोत्स्वाना, ब्राझील, कोलंबिया, कोमोरोस, घाना, केनिया, मोझांबिक, पेरू, रवांडा, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि झांबिया अशी प्रवास बंदी घालण्यात आलेल्या देशांची नावे आहेत.