पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे पालिकेच्या नगराध्यक्षपदी उषा रुदेश नागवेकर तर उपनगराध्यक्षपदी मनोज हरमलकर यांची बिनविरैध निवड झाली . पेडणे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी गुरुवारी पेडणे पालिका सभागृहात नवर्निवाचित नगरासेवकांची खास बैठक घेण्यात आली. या बैठकीत निर्वाचन अधिकारी म्हणून पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी उषा नागवेकर यांची नगराध्यक्षपदी तर मनोज मेघश्याम हरमलकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज उषा नागवेकर तसेच उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज मनोज हरमलकर यांचा होता. त्यामुळे दोन्हीही पदाची बिनविरोध निवड झाल्याची माहिती यावेळी निर्वाचन अधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी दिली.
या बैठकीला पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी संदिप गावडे, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक विष्णू साळगावकर, नगरसेवक माधव सिनाई देसाई, नगरसेवक शिवराम तुकोजी , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका अश्विनी अरविंद पालयेकर, नगरसेविका विशाखा विश्राम गडेकर , नगरसेविका राखी कशालकर तसेच नवर्निवाचित नगराध्यक्ष ऊषा नागवेकर व उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर हे दहाही नगरसेवक उपस्थित होते.
सहा नगरसेवकांननी घेतली मराठीतून शपथ
नवनिर्वाचित नगरसेवकांना पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी शपथ दिली . उषा नागवेकर व तृप्ती सावळ देसाई यांनी इंग्रजीतून व माधव सिनाई देसाई यांनी कोंकणी तर राखी कशाळकर , आश्विनी पालयेकर , विशाखा गडेकर , सिद्धेश पेडणेकर , विष्णू साळगावकर व शिवराम तुकोजी या सहा नगरसेवकांनी मराठीतून शपथ घेतली .
उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी केला महिलांचा सन्मान, बाबू आजगावाकरमुळेच नगराध्यक्षपदः उषा नागवेकर
नगराध्यक्ष उषा नागवेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर पत्रकारांकडे बोलताना आपल्या विजयाचे श्रेय मतदाराना , भाजपा पक्षाला आणि आपल्याला राजकारणात आणलेले माजी नगराध्यक्ष डॉक्टर वासुदेव देशप्रभू याना देतानाच आजपर्यंत पालिकेचा यशस्वी प्रवास हा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यामुळे झाला असे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी सांगितले .
बाबू मुळे नगराध्यक्षपद
आपल्याला आता दुसऱयांदा नगराध्यक्षपद मिळाले ते केवळ उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यामुळेच असा दावा करून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे केवळ बोलत नाही तर ते कृती करतात. महिलला त्यांचे अधिकार आणि उच्चपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आता दहाही प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले .
उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर यांनी बोलताना नगराध्यक्ष उषा नागवेकर, सहकारी नगरसेवक आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सहकार्यातून विकास करणार असल्याचे सांगितले .
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचेही अभिनंदन केले. त्यावेळी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, माजी उपनगराध्यक्ष नारायण मयेकर, रामा सावळ देसाई, प्रकाश कांबळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ , सुशांत मांदेकर , सरपंच संतोष मळीक , आबा तळकटकर , नेहा आसोलकर , ज्ञानेश्वर परब , रुदेश नागवेकर आदी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते .