कोरोनाबाधितांची संख्या 21 वर : जमखंडीतील एकाला लागण
वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात शनिवारी एका दिवसात कोरोनाचे सात रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या 21 वर पोचली आहे. बागलकोट येथील एका 48 वर्षाच्या महिलेला कोरोनाची बाधा झाली असून बागलकोट येथील रुग्ण क्रमांक 186 च्या संपर्काने ही महिला बाधित झाली तर याच रुग्णाच्या संपर्काने 65 वर्षीय वृद्धाला पण बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
जमखंडी पोलीस वसाहतमधील रहिवासी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला मुधोळ येथे कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली होती. या रुग्ण क्रमांक 263 च्या संपर्कात आलेल्या 32 वर्षाचे दोन तर 43 वर्षाच्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात जमखंडीतील एकाला कोरोनाची बाधा झाली असून कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचे स्वॅब प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते.
या रुग्ण क्रमांक 381 ला कोणापासून बाधा झाली हे कळू शकले नसून याचा शोध अधिकारी घेत आहेत. याचे निवास येथील सरकारी दवाखान्याजवळील भागात असून हा परिसर सायंकाळी सीलबंद करण्यात आला.
25 पोलिसांना क्वॉरंटाईन
जमखंडीतील पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 25 पोलिसांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून बंदोबस्ताकरिता पोलिसांचे संख्याबळ कमी झाले असले तरी कोरोनाच्या धास्तीमुळे रस्ते दुपारनंतर ओस पडत आहेत.