प्रतिनिधी/ कराड
कराड तालुक्यातील मलकापूर येथील एका 32 वर्षीय पुरुषाने आपल्या 2 वर्षाच्या मुलीसह कोरोनावर यशस्वी मात केली. आज कृष्णा हॉस्पिटलमधून या दोघांसह आगाशिवनगर आणि खोडशी येथील 68 वर्षीय वृद्ध कोरोनामुक्त पुरुषांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
कराड तालुक्यात जिह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या असल्याने भीतीचे वातावरण असले, तरीही दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांचेही प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.
आज तर कृष्णा हॉस्पिटलमधून चार कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात बापलेकीचाही समावेश होता. मलकापूर येथील 32 वर्षीय पुरुष आणि त्याची 2 वर्षीय मुलगी या दोघांनाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज यशस्वी उपचारानंतर या बापलेकीसह 68 वर्षीय 2 वृद्ध पुरुषांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार करत आजअखेर कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 34 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, राजेंद्र संदे, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.
खोडशी येथील रूग्ण म्हणाला की, आपण कोरोना पॉझिटिव्ह झालो. त्यानंतर कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे आपले चौदा दिवस कसे गेले, ते समजले नाही. येथील डॉक्टर्स, नर्स, स्टाफने आमची चांगली व्यवस्था केली. आम्हाला चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे आम्ही कोरोनावर मात करू शकलो.