ऑनलाईन टीम / मुंबई :
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर गुजरात, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांनी देखील आपापल्या राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न उपस्थित होत होता.

यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षेसंदर्भात येत्या एक-दोन दिवसात जाहीर करणार आहोत, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी सांगितले.
त्या म्हणाल्या, मंत्रिमंडळ बैठकीत बारावीची परीक्षा रद्द करण्यावर एकमत झाले आहे. मात्र हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवत आहोत. आज किंवा उद्या याबाबत बैठक होईल. त्या बैठकीत ते प्रस्तावावर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ.
पुढे त्या म्हणाल्या की, सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही हा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला आहे, असेही त्यानी यावेळी सांगितले.
दरम्यान, याआधी मंगळवारी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्यात आल्या आहेत. देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.