प्रतिनिधी/ बेळगाव
बुधवारी बेंगळूर येथील आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगावच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश नव्हता. त्यामुळे बेळगावकरांना दिलासा मिळत असतानाच आणखी 135 जणांचे अहवाल प्रयोगशाळेत लटकलेलेच आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
चीनमधून आयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टींग किटसंदर्भात वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सध्या तपासणीसाठी या किटचा वापर न करण्याचा सल्ला सर्व राज्य सरकारांना दिला आहे. बेळगावातील स्वॅब तपासणीसाठी बेंगळूर व शिमोगा येथील लॅबना पाठविण्यात येतात. किटअभावी दोन्ही ठिकाणी तपासणी खोळंबल्याचे समजते.
गुरुवारपासून बेळगावातच स्वॅब तपासणी होणार आहे. गेल्या चार दिवसात बेळगाव येथील एकच रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, याचा अर्थ बेळगावात कोरोनाचा प्रभाव ओसरत चालला आहे का? असा काढला जात आहे. ‘तरुण भारत’ला मिळालेल्या माहितीनुसार स्वॅबची तपासणीच रखडल्याने अहवालही लटकलेलेच आहेत.
बुधवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये बेंगळूर व गुलबर्गा येथील 7 जणांना कोरोना लागण झाल्याचा उल्लेख होता. सायंकाळी नंजनगुड्ड येथील आणखी दोघा जणांची भर पडली. त्यामुळे दिवसभरात केवळ 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जाहीर करण्यात आली असली तरी तपासणीअभावीच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते.
राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 427 वर पोहोचली असून त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्हय़ातील 2224 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 411 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 708 जणांनी चौदा दिवसांची तर 1066 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण 923 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यापैकी 731 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 43 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगुंदी, हिरेबागेवाडी व कुडची येथील तिघेजण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी जाऊ देण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 39 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.