- अजित पवारांनी शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 60वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अनोख्या अंदाजात सूचक फोटो ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे. अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामना दैनिकाला मुलाखत दिली होती. यावेळी आमचे सरकार तीनचाकी रिक्षा असली तरी त्याचे स्टेअरिंग व्हील माझ्या हातात असल्याचे उद्धव यांनी म्हटले होते. मात्र, आज अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा इलेक्ट्रीक कारमधील एक छायाचित्र शेअर केले. यामध्ये कारचे स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात आहे. त्यामुळे अजित पवारांना नेमके काय म्हणायचे आहे, याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.