सत्यभामाबाईं टिळक

दापोली तालुक्मयातील लाडघर येथील बाळ घराणे. बाळ घराणे हे कोकणातील मध्यमवर्गीय कुटुंब मात्र दानधर्मात अग्रेसर होते. बाळ कुटुंबातील तापीबाई निरक्षर होत्या. 1871 साली वैशाख महिन्यात तापीबाईंचा विवाह स्वातंत्र्याचा वणवा असलेल्या बाळ गंगाधरराव टिळक यांच्या सोबत संपन्न झाला. तापीबाईंचे ‘सत्यभामा’ असे नामकरण करण्यात आले. बाळ कुटुंबातील तापीबाई आता टिळकांच्या बाळाच्या अर्धांगिनी झाल्या. टिळकांच्या वडिलांचा फलज्योतिषावर फार विश्वास. टिळकांच्या कुंडलीत ज्योतिषांनी द्विभार्यायोगाचे भाकीत केले होते. परंतु कालांतराने टिळक व सत्यभामाबाईंच्या संसाराने ते खोटे ठरविले. टिळक व सत्यभामाबाईंच्या सप्तपदी पुढे नवग्रहांनी सुद्धा हात टेकले होते. टिळकांच्या घरात सून म्हणून आल्यावर सत्यभामाबाईंनी वडिलधाऱयांचे निधन, टिळकांचे शिक्षण, टिळकांचा स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग व टिळकांना झालेल्या शिक्षा अतिशय जवळून अनुभवल्या. सत्यभामाबाईंचे राहणीमान अतिशय साधे होते. अतिशय अबोल मात्र घरी येणाऱया जाणाऱयांचे आदरतिथ्य नेटाने पार पाडायच्या. लोकमान्यांचा व्याप बघता कुटुंबाची जबाबदारी सत्यभामाबाईंनी समर्थपणे सांभाळली. मुलांचे संगोपन स्वतः अशिक्षीत असूनही मुलांच्या शिक्षणाकडे त्या आवर्जून लक्ष द्यायच्या.
टिळक व सत्यभामाबाई दोघांनाही मधुमेहाचा आजार होता. टिळक मंडालेच्या तुरूंगात असतांना महिन्यातून एकदा कुटुंबाला पत्र लिहिण्याची परवानगी होती. सत्यभामाबाईंची काळजी कमी व्हावी म्हणून स्वतःच्या प्रकृती बाबत, अगदी किती वजन आहे याचे तपशील टिळक लिहायचे. टिळकांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रात ते सत्यभामाबाईंच्या प्रकृतीविषयी आस्थेने विचारपूस करत. सत्यभामाबाई आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करायच्या. टिळक पत्रातून त्यांना वैद्य व काही औषधे सुचवायचे. सत्यभामाबाईंच्या आजाराची मात्रा मात्र तुरुंगात होती. टिळक तुरुंगात असताना जून 1912 टिळकांना सत्यभामाबाईंच्या मृत्यूची तार मिळाली. या बातमीने टिळकांवर मोठा आघात झाला. सत्यभामाबाईंच्या अखेरच्या दिवसात टिळक जवळ नव्हते. सत्यभामाबाईंना आशा होती टिळकांची सुटका होईपर्यंत त्यांची आयुष्याच्या चक्रातून सुटका होणार नाही. परंतु नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. टिळकांना झालेल्या राजद्रोहाच्या शिक्षेपेक्षा भयंकर शिक्षा सत्यभामाबाईंनी एक पत्नी म्हणून भोगली. टिळकांना शिक्षा झाल्यावर सत्यभामाबाईंनी घराबाहेर पाय ठेवला नाही. काळय़ा बांगडय़ा व काळी वस्त्रेच त्यांनी परिधान केली. सत्यभामाबाईंनी त्या काळात कुठलाही दागिना घालून त्याची शोभा वाढवली नाही अखेर पर्यंत सत्यभामाबाईंनी सौभाग्याचा एकमेव दागिना धारण केला. सत्यभामाबाईंचा खरा दागिना मात्र लोखंडी बेडय़ांत होता. संसारात सत्यभामाबाईंचा समर्थ सहधर्मचारिणी म्हणून सहवास लाभल्याने टिळकांना राष्ट्रधर्माची साधना शक्मय झाली.
टिळक, गांधीजी, सावरकरांची विचारसरणी भिन्न होती. मात्र त्यांच्या सहधर्मचारिणीचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे दिलेल्या योगदानात समानता आहे. गांधीजींचे महात्म्य, सावरकरांची वीरता, टिळकांच्या लोकमान्यतेला बळ देणारी अंतर्मनं ही त्यांच्या सहधर्मचारिणींची होती. आपल्या पतीच्या विचारांची सामर्थ्याची देशाला गरज आहे, ह्या भावनेतून त्यांनी आपल्या कौटुंबिक सुखाला तिलांजली दिली. उल्लेखनीय म्हणजे सत्यभामाबाई, कस्तुरबा व यमुनाबाई तिघींचे निधन त्या सौभाग्यवती असतांना झाले. त्यांचे वैवाहिक आयुष्य जरी वैराग्य ठरले तरी त्यांच्या तपश्चर्येची सांगता स्वातंत्र्याने झाली. देशाच्या इतिहासातील ह्या आणि अशा अनेक महातपस्वी सौभाग्यवतींना अभिवादन.
कस्तुरबा गांधी

गोकुळदास मकनजी व वज्रकुंवर दाम्पत्याचे तिसरे अपत्य कस्तुरबा. कस्तुरबांचा जन्म एप्रिल 1869 सालचा. बालपणापासूनच कस्तुरबा धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. कुटुंब वैष्णव विचारांवर आस्था ठेवणारे होते. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कस्तुरबांचा विवाह वयाच्या सातव्या वषीच निश्चित झाला. कस्तुरबांचा गांधीजींसमवेत विवाह झाला तेव्हा त्यांचे वय होते अवघे 13 वर्षांचे. गांधीजींपेक्षा कस्तुरबा सहा महिन्यांनी मोठय़ा होत्या. मात्र आयुष्यभर त्यांनी गांधीजींचे मोठेपण स्वीकारले होते. कस्तुरबांनी 1888 साली एका पुत्राला जन्म दिला मात्र तो अल्पायुषी ठरला. गांधीजी विलायतेला गेले तेव्हा कस्तुरबा सासरीच होत्या. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कस्तुरबांवरच होती. गांधीजी पुढे भारतात आल्यावर वकिली करु लागले. कस्तुरबांना पुत्ररत्न झाले. पुढे गांधीजींनी कस्तुरबा व आपल्या मुलाला 1896 साली आफ्रिकेत नेले.
बालवयापासून ते गांधीजींच्या अनेक सामाजिक उपक्रमात व सत्याग्रहात कस्तुरबांचा प्रत्यक्ष सहभाग होता. आफ्रिकेत असतांना गांधीजींच्या आयुष्यात अनेक बदल झाले. गांधीजींचा कल वैराग्याकडे अधिक झुकत होता. गांधीजींच्या प्रत्येक निर्णयाला कस्तुरबांनी नेहमीच साथ दिली. गांधीजींच्या तपश्चर्येत कस्तुरबा सदैव तपस्विनी म्हणूनच जगल्या. आपल्या आवडी निवडी विचारांना मुरड घालत कस्तुरबांनी पदोपदी गांधीजींना साथ केली. कस्तुरबा स्वयंपाकात फार सुग्रण होत्या. मात्र गांधीजींच्या अस्वादव्रतामुळे कस्तुरबांच्या सुग्रणाला ग्रहण लागले. गांधीजींनी अनेक अलंकार दागदागिने कस्तुरबांना घेऊन दिले होते. परंतु पतीचे व्रतस्थ आयुष्य कर्तव्य समजून कस्तुरबांनी ते परिधान केले नाहीत. गांधीजींचे विचार, तत्व, व्रत हे सर्व कस्तुरबांनी आनंदाने आत्मसात केले होते. गांधीजींच्या सत्याग्रहाचे, उपवासाचे, असहाकाराच्या अनेक घटनांना कस्तुरबांनी सहकार्य केले. गांधीजींचा अनुनय हेच मुळात अनन्यसाधारण आहे. गांधीजींची मौनव्रत सुध्दा कस्तुरबांना बोलके भासायचे. इतक्मया कस्तुरबा गांधीजींसमवेत एकरूप झाल्या होत्या. कस्तुरबांना गांधीजींपासून सर्व ‘बा’ म्हणायचे. नोव्हेंबर 1943 पासून कस्तुरबांची प्रकृती खालावू लागली होती. फेब्रुवारी महिन्यात कस्तुरबांची तब्येत अधिकच खालवली होती. पुण्याच्या आगाखान पॅलेस मध्ये गांधीजी व कस्तुरबा हे संन्यासी दांपत्य होते. 22 फेब्रुवारी 1944 रोजी गांधीजींच्या मांडीवर डोके ठेवून कस्तुरबांनी आपला अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपश्चात गांधीजींनी स्वहस्ते कातलेली सुताची साडी परिधान करुन कस्तुरबा अनंतात विलीन झाल्या. अंतसमयी कस्तुरबांना गांधीजींचा लाभलेला सहवास पत्नी म्हणून त्यांच्या आयुष्यातला भाग्याचा क्षण होता. आपल्या सहा दशकांच्या सहजीवनात कस्तुरबांनी गांधीजींची प्रत्येक परिस्थितीत साथ दिली. महापुरुषाच्या पत्नी म्हणून कस्तुरबांचे आयुष्य महापतिव्रता म्हणून नोंदले गेले. गांधीजींच्या कठोर व्रतांचा ताप सहन करूनही कस्तुरबा त्या प्रखर तेजाची शीतल छाया म्हणून आयुष्य जगल्या. म्हणूनच पत्नी, माता असूनही कस्तुरबा गांधीजींपासून सर्वांच्या प्रेमळ ‘बा’ ठरल्या.
यमुनाबाई सावरकर

जव्हार संस्थानाचे दिवाण भाऊराव चिपळूणकर यांची कन्या यमुनाबाईंचा जन्म 1888 सालचा. वयाच्या 13 व्या वषी 1901 साली त्यांचा विवाह तात्याराव सावरकरांसोबत झाला. प्रखर राष्ट्रभक्त, क्रांतीकारकांचे मुकुटमणी असलेल्या तात्यारावांसमवेतचा संसार जणू यमुनाबाईंच्या आयुष्यातले एक क्रांतीपर्वच. रात्री अपरात्री अचानकपणे कुणी क्रांतिकारी सावरकरांच्या घरात आश्रयाला यायचे. तर कधी पोलिसांची घरावर धाड पडायची. पुढे यमुनाबाईंना पुत्ररत्न झाले. तात्याराव कायद्याच्या शिक्षणासाठी विलायतेत असतांना पुत्र प्रभाकरला देवाज्ञा झाली. पती विलायतेत व पदरातील लहानगा प्रभाकर परलोकी गेल्याने माता व पत्नीचे दुहेरी दुःख मात्र त्यांच्या पदरी शिल्लक होते.
तात्यारावांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकरांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेने सावरकर कुटुंबीयांवरील आघात सुरूच होते. त्यात इंग्रजांनी सावरकरांच्या घरावर जप्ती आणून सावरकर बंधूंच्या पत्नींना निर्वासित केले. कधी देवळात तर कधी उपाशी पोटी सावरकर पत्नींनी दिवस काढले. तात्यारावांना पन्नास वर्षे शिक्षा झाली, तेव्हा भेटावयास आलेल्या पत्नीला धीर देत तात्याराव उद्गारले, ‘चार काडय़ा जमवून घरटे बांधणे ह्यालाच संसार म्हणायचा असेल, तर असला संसार चिमण्या कावळे पण करतात, संसाराचा जर याहून भव्य अर्थ घ्यायचा तर ही चूल फोडून टाकू, जेणेकरून सहस्त्र घरात कदाचित सोन्याचा धूर निघेल.’ घराची कुटुंबाची राख होऊनही तात्यारावांचे शब्द यमुनाबाईंसाठी प्रेरणादायी ठरले. जन्मठेपेतून मुक्त झाल्यावर रत्नागिरी येथे यमुनाबाईंनी अस्पृश्यता निवारणाच्या महान कार्यात तात्यारावांना मोलाची साथ दिली. गांधीजी रत्नागिरीला आले असता त्यांनी व कस्तुरबांनी यमुनाबाईंच्या दिव्यत्वाच्या प्रचितीला अभिवादन केले. यमुनाबाईं-तात्यारावांच्या संसारात पुढे काही दिवस सुखाचे अवतरले. त्यांना पुढे दोन अपत्ये झाली. देशाचे स्वातंत्र्य बघण्याचे भाग्य यमुनाबाईंच्या नशिबी होते. यमुनाबाईंना सगळे प्रेमाने ‘माई’ म्हणत. स्वातंत्र्यानंतर काही चढ-उतार सुद्धा सावरकर कुटुंबाला बघावे लागले. तात्यारावांच्या अखेरच्या जाहीर सत्काराला यमुनाबाई उपस्थित होत्या. शरीर साथ देत नव्हते, वाढत्या वयाबरोबर आजार सुद्धा बळावू लागले. यमुनाबाईं रुग्णालयात असतांना तात्याराव त्यांना भेटावयास जाण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर 8 नोव्हेंबर 1963 साली दीर्घ आजाराने यमुनाबाईंचे निधन झाले. तात्यारावांच्या सांगण्यावरून यमुनाबाईंचा देह परस्पर अंत्यविधीसाठी पाठवण्यात आला. कुठलीतरी भेट अखेरची ठरणार म्हणत तात्यारावांनी आपल्या कृतीचे कठोर समर्थन केले. मृत्यूपश्चात करावयाचे अंत्यविधी करण्यास बुद्धिवादी तात्यारावांनी स्पष्ट नकार दिला. तात्यारावांच्या सुपुत्राने यमुनाबाईंचे सर्व धार्मिक विधी पार पाडले. तात्यारावांनी यमुनाबाईंच्या स्मृतीप्रीत्यर्थ काही सेवाभावी संस्थांना देणगी देऊन संस्कार पार पाडले. तात्यारावांचे विचार कठोर विज्ञाननिष्ठ होते, मात्र त्यांनी ते यमुनाबाईंवर कधी लादले नाहीत. असे असूनही यमुनाबाईंनी आपली ईश्वरभक्ती व तात्यारावांवरील श्रद्धा कधीच ढळू दिली नाही. प्रवृत्त व परावृत्त मानसिकतेचा तात्याराव व यमुनाबाईंच्या संसारात लवलेशही नव्हता. म्हणूनच यमुनाबाई सावरकर कुटुंबीयांच्या ‘माई’ होत्या.