वृत्तसंस्था /मॉस्को
सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची दीर्घ काळानंतर भेट होऊ शकते. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रप्रमुखांदरम्यान ही बैठक होण्याची शक्यता आहे. रशिया, चीन आणि भारत यांच्यातील शिखर परिषद नजीकच्या भविष्यात होऊ शकते, असे रशियाच्या राष्ट्रपतींचे सहाय्यक यूरी उशाकोव्ह यांनी सांगितले.
रशिया, भारत अन् चीन (आरआयसी) फॉरमॅटमध्ये सहकार्यावर चर्चा झाली आहे.जिनपिंग आणि पुतीन यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच आरआयसी फॉरमॅटमध्ये शिखर परिषदेसाठी प्रयत्न होऊ शकतात, असे उशाकोव्ह म्हणाले. भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न रशिया करत आहे. भारताने पुतीन यांच्या दौऱयादरम्यान लडाखमधील चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. उत्तर सीमेवर ‘विनाकारण आक्रमकते’मुळे आव्हाने निर्माण झाली असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.