कितीही प्रकारच्या साडय़ा बाजारात दिसत असल्यातरी मानवी स्वभावाप्रमाणे आपल्याला आणखीन काही वेगळं हवं असतं. साडय़ांच्या फॅब्रिकमध्ये सहसा कॉटन, सिल्क, लिनन, सॅटिन, शिफॉन, जॉर्जेट, नेट असे ढोबळ प्रकार मिळतात. मात्र डेसिसचा फॉर्म व कट साडीपेक्षा वेगळा असल्यामुळे तिथे अनेकविध फॅब्रिक्सचा वापर केला जातो. यात वेल्वेट, वूल, स्पँडेक्स, रेयॉन, कॅशमेर, ज्यूट फायबर, बँबू फायबर, केण्याचे तंतु, फ्लॅक्सचे धागे, ऍपेलिक, सोनं, चांदी, ऍस्बेस्टॉस, ग्लास अशा अनेक धाग्यांपासून कापड बनवले जाते.

नाविन्याचा सोस असणाऱयांना अशा अनोख्या फॅब्रिक्सचा मोह होतो. मग चक्क अशा कापडाच्या ताग्यापासून साडय़ा बनवल्या जातात. याला यार्डेज साडी म्हणतात. (यार्ड म्हणजे लांबी मोजण्याचे माप). दुकानातून आपल्याला आवडणाऱया कापडाचे पाच किंवा सहा मिटर्सचे, डबल पन्न्याचे कापड आणून, त्याला साडीप्रमाणे वापरले जाते. याचा एक फायदा म्हणजे जे प्रकार, डिझाईन्स व पोत साडय़ांमध्ये पाहायला मिळत नाहीत, ते या यार्डेजमध्ये मिळतात. सहसा यात प्लेन कापडाची निवड होते. त्यावर कोणतेही काँट्रास्ट प्रिंटचे ब्लाऊज उठून दिसते. यार्डेजचा वापर करताना ते कापड इतरत्र डेसिससाठी वापरलं जात नाहीये.