बेळगाव : बेळगावातील दोन नवदांपत्यांनी आपल्या संसाराची गोड सुरुवात रायगडावर अनवाणी पायाने चढून केली आहे. रायगडावर जाऊन त्यांनी सर्वप्रथम प्रेरणामंत्र म्हणून आपल्या सुखी संसाराची प्रार्थना केली. हर्षद आणि अभिषेक बुद्रुक राहणार बाबले गल्ली अनगोळ आणि माधुरी आणि सागर चौगुले राहणार गणेशनगर सांबरा अशी या दोन नवविवाहित दांपत्यांची नावे आहेत. लग्न झाल्यावर प्रत्येक जोडपे बाहेर फिरायला वेगवेगळय़ा पर्यटन ठिकाणी जातात. मात्र आपल्या संसाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीला भेट देऊन आणि महाराजांचे दर्शन घेऊन पुढील सांसारिक आयुष्याला सुरुवात करण्यासाठी त्यांनी रायगडाला भेट देण्याचे ठरविले. त्यानुसार या दोन्ही जोडप्यांनी ही मोहीम पूर्ण केली. आपल्या संसारात अडथळा आला की शिवरायांचे चरित्र डोळय़ासमोर ठेवून त्यांचा आदर्श बाळगून चांगला संसार करण्याची प्रार्थना यावेळी या जोडप्यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी त्यांनी रायगडावर जाताच प्रेरणा मंत्र म्हणताच तेथील उपस्थित नागरिकांनीही प्रेरणा मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे अवघ्या उपस्थितांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. या बरोबरच या दोन्ही नवजोडप्यांच्या उपक्रमाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदनही करण्यात आले.
Previous Articleभिवंडी : एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग
Next Article बाळेकुंद्री खुर्द परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात
Related Posts
Add A Comment