ऑनलाईन टीम/ तरुण भारत
कोरोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणूने जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलंय. हा विषाणू कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अनेक पटींनी धोकादायक असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहे. मात्र, अद्यापही या विषाणूबाबत पुरेशी माहिती समोर आलेली नाही. या विषाणूच्या संरचनेत अनेक बदल झाल्यानं हा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक झाल्याचं निरिक्षण संशोधक व्यक्त करत आहेत. मात्र, या विषाणूचं बदललेलं रुप नेमकं कसं आहे? हे अद्याप समोर आलं नव्हतं. आता रोममधील विख्यात बांबिनो गेसू रुग्णालयाने ओमिक्रॉनचा पहिला फोटो जारी केला आहे.
हा ओमिक्रॉनचा फोटो एखाद्या नकाशासारखा दिसत आहे. यात ओमिक्रॉन विषाणूच्या रचनेत डेल्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. यात सर्वात महत्त्वाचे बदल प्रोटिनवर झाले आहेत. हेच प्रोटिन करोना विषाणूला मानवी शरिरात प्रवेश करण्यास मदत करतात, अशी माहिती या रुग्णालयातील संशोधकांच्या पथकाने दिलीय.
