वृत्तसंस्था/ हरारे
लिटॉन दासचे दमदार शतक तसेच शकीब अल हसनच्या 5 बळींच्या जोरावर बांगलादेशने शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 155 धावांनी दणदणीत पराभव करून मालिकेत विजयी सलामी दिली आहे.
उभय संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 50 षटकांत 9 बाद 276 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 121 धावांत आटोपला.
बांगलादेशची एकवेळ स्थिती 4 बाद 74 अशी केविलवाणी होती. त्यानंतर शतकवीर दासने मेहमुदुल्लासमवेत 93 धावांची भागिदारी केली. अतिफ हुसेनने 35 चेंडूत 45 धावा जमविल्या. झिम्बाब्वेतर्फे जाँग्वेने 51 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर झिम्बाब्वेच्या डावात चेकाबेव्हाने 54 धावा जमविल्या.
बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने 30 धावांत 5 गडी बाद केले. वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने सर्वाधिक बळी नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 274 बळी घेतले असून त्याने यापूर्वी नोंदविलेला मुर्तर्झाचा विक्रम मागे टाकला. आता या दोन संघातील दुसरा सामना रविवारी खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 50 षटकात 9 बाद 276 (लिटॉन दास 102, अतिफ हुसेन 45, जाँग्वे 3-51), झिम्बाब्वे सर्वबाद 121 (चेकाबेव्हा 54, शकीब अल हसन 5-30).