प्रतिनिधी / विटा
आपल्या चारचाकी गाडीतून भाजी विकण्यास जाताना गाडीने अचानक पेट घेतल्याने रघुनाथ ताटे या भाजीविक्रेत्याचा होरपळून मृत्यू झाला. विट्यातील विवेकानंदनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
विट्यातील विवेकानंद नगर परीसरातील निलसागर हॉटेलच्या पाठीमागील बाजूस वास्तव्यास असणारे रघुनाथ रामचंद्र ताटे हे आपल्या चारचाकी गाडीतून भाजीपाला व किराणा सामनाची विक्री करत होते. आज सकाळी रघुनाथ ताटे हे आपल्या गाडीतून माल विक्री करण्यासाठी निघाले. यावेळी गाडीत बसल्यानंतर गाडी सुरू करताच अचानक शॉर्ट सर्किट होऊन गाडीने पेट घेतला. यावेळी गाडीत अडकून पडलेल्या ताटे यांना वेळेत बाहेर पडता आले नाही. यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर ताटे यांच्या मुलाने देखील बाहेर येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत रघुनाथ ताटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे विटा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.