ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोना फैलावाचे केंद्रबिंदू असलेल्या चीनच्या वुहान शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता शून्यावर आली आहे. वुहानमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अखेरच्या कोरोना रुग्णाला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. ‘एनएचसी’चे प्रवक्ते मी फेंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमध्ये आढळला. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने झाला. काही दिवसातच वुहान कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. वुहानमधील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चीनमधील 42,000 वैद्यकीय कर्मचारी हुबेई येथे पाठविण्यात आले होते. या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर 18 फेब्रुवारीपासून तेथील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत गेली.
चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 836 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4633 जणांचा मृत्यू झाला आहे. वुहान शहरात सध्या एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. चीनमध्ये रविवारी तीन नवीन रुग्ण सापडले असून, त्यापैकी दोघेजण विदेशातून परतलेले तर एकाला स्थानिक पातळीवरच संसर्ग झाला असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.