गटार बांधकाम करण्यास अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविले
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर दुसरा मेन दुसरा क्रॉस येथील रस्त्यावर अतिक्रमण करून गटार बांधकाम करण्यास अडथळा करण्यात आला होता. सदर अतिक्रमण हटवून गटार बांधकाम करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिकेला सोमवारी देण्यात आले होते. याची दखल घेत मंगळवारी येथील अतिक्रमण हटवून गटारीसाठी खोदाई करण्यात आली.
शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेषतः गटारींवर अतिक्रमण करून शेड उभारण्यात येते. व्यावसायिक आस्थापनांसमोर अतिक्रमण अधिक प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदाशिवनगर परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी गटारीवरील अतिक्रमण विकासकामे राबविण्यास अडचणीचे ठरत आहे. दुसरा मेन दुसरा क्रॉस येथे एका व्यावसायिकाने दुकानासमोर शेड घालून अतिक्रमण केले होते. तसेच गटारीचे बांधकाम करण्यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्यावतीने महापालिकेला देण्यात आले होते. सदर निवेदन सोमवारी महापालिकेकडे सादर केल्यानंतर लागलीच याची दखल घेत कारवाई करण्यात आली.
मंगळवारी येथील शेड हटवून गटारीवर घालण्यात आलेले काँक्रीट फोडण्यात आले. संपूर्ण गटारीवरील अतिक्रमणे हटवून बांधकामासाठी चर खोदण्यात आली. अतिक्रमण हटवून गटारीचे बांधकाम हाती घेण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.