प्रतिनिधी/ सातारा
सातारा पोलीस दलाची छाती अभिमानाने फुलून जावी अशी घटना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे. यामध्ये सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांना महाराष्ट्र शासनाने गडचिरोलीत अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र शासनाचे ’असाधारण आसुचना कुशलता पदक’ तसेच महाराष्ट्र शासनाचे ’विशेष सेवा पदक’ जाहीर झालेले आहे. तर जिल्हा पोलीस दलातील फलटण उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांना देखील राज्य शासनाने ’विशेष सेवा पदक’ जाहीर केल्याने पोलीस दलाची मान उंचावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी 13 ऑगस्ट 2018 रोजी अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांच्या कार्यकालात त्यांनी दक्षिण गडचिरोली या दुर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा विश्वास संपादन करुन गोपनीय सुत्रांचे/खबऱयांचे जाळे निर्माण केले. त्यांच्या या पुढाकारामुळे त्यांना संपूर्ण गडचिरोली तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्याच्या सिमावर्ती भागातून देखील गोपनिय माहिती प्राप्त होण्यास सुरुवात झाली.
त्यांनी गडचिरोली जिह्यातील नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबूझमाड जंगल भागात पोलीस खबरी यंत्रणा मजबूत करण्यासाठी महत्वाची कामगिरी केली. त्यांनी निर्माण केलेल्या बातमीदारांच्या जाळ्यामुळे सी-60 पथकांना गडचिरोली जिह्यातील अतिदुर्गम नक्षल संवेदनशिल भागात तसेच छत्तीसगड राज्याच्या सिमावर्ती भागात नक्षलविरोधी माहिमा यशस्वीरित्या राबवता आल्या. त्यांच्या या कामाची दखल घेवून केंद्र शासनाने त्यांना दि. 23 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय गृह विभागातर्फे असाधारण आसुचना कुशलता पदक जाहीर केले आहे.
तर गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात सलग 2 वर्षे सेवा बजावत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि. 30 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना ’विशेष सेवा पदक’ जाहीर केले आहे. यापर्वी दिनांक 1 मे 2020 रोजी त्यांना पोलीस महासंचालक पदक देखील प्राप्त झालेले आहे.
हा गौरव माझ्यासह पोलीस दलासाठी आनंददायी
पोलीस सेवेत असताना जनतेचे रक्षण करणे ही आमचे आद्य कर्तव्य असते. त्याचप्रमाणे मी जेव्हा दक्षिण गडचिरोली दुर्गम भागात काम करत असताना वरिष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करु शकलो. मोठय़ा धाडसाने कारवाया करताना तिथे अधिकाऱयांचे मार्गदर्शन, कर्मचाऱयांचे सहकार्यही लाभले. अबूझमाड जंगलात आजपर्यंत कोणीही पोहोचू शकले नव्हते. तिथे मी व माझी टीम पोहोचली. तिथे आम्ही ज्या मोठय़ा कारवाया केल्या त्याचा राज्य व केंद्र शासनाने केलेला गौरव माझ्यासाठी आनंददायी असून शासनाचे मी आभार व्यक्त करत, अशी भावना ’तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.