ऑनलाईन टीम / पुणे :
अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोव्हावॅक्स आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोवोवॅक्स या कोरोना लसीच्या उत्पादनाची सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एक ट्विट करीत माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटसोबत सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी बॅचसह एक फोटो देखील टाकला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या ट्विट म्हटले की, हा एक नवा माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील आमच्या कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली आहे.
ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस सप्टेंबर 2021 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे, असे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी याआधीच दिली होती.