उच्चशिक्षण मंत्री अश्वथनारायण यांचे प्रतिपादन : व्हीटीयूचा 21 वा पदवीदान समारंभ उत्साहात : राज्यपाल, लोकसभा अध्यक्षांची उपस्थिती
प्रतिनिधी / बेळगाव
टेक्निकल एज्युकेशन, आयटी, इनोव्हेशन, स्टार्टअप या क्षेत्रात कर्नाटकने वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळेच देशभरातील विद्यार्थी आता कर्नाटककडे वळत आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्राला एक वेगळी ओळख मिळवून देणाऱया एस. जी. बाळेकुंद्री यांच्या स्मरणार्थ बेळगावमध्ये अध्ययन सेंटर सुरू करून त्याद्वारे तरुणांचा कौशल्य विकास केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरह्यूमध्ये निवड होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी टॅलेन्ट एक्सलन्ट प्रोग्रॅम राज्य सरकार आखत आहे. राज्यातील सर्वोत्तम 30 इंजिनिअरिंग (सुपर-30) कॉलेजची यादी तयार करून त्या विद्यार्थ्यांचा जागतिक दर्जाचा विकास केला जाईल, असे प्रतिपादन राज्य उच्चशिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी केले.

व्हीटीयूचा 21 वा वार्षिक पदवीदान सोहळा गुरुवारी ज्ञान संगम येथे पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, कुलगुरु प्रा. करिसिद्धप्पा, मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार प्रा. रंगास्वामी बी. ई., रजिस्ट्रार प्रा. आनंद देशपांडे, विभागप्रमुख व मानद डॉक्टरेटप्राप्त व्यक्ती उपस्थित होत्या.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत यापुढील जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. देशात नवी ऊर्जा निर्माण झाली असून डिजिटलायझेशनमुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जगातील सर्व मोठय़ा कंपन्यांमध्ये उच्चपदावर भारतीय व्यक्तीच आहेत. त्यामुळे भविष्यात भारताला बुद्धिमत्तेचा विश्वगुरु म्हणून पुढे आणूया, असे विचार व्यक्त केले.
रोजगार देणारे बना
राज्यपाल थावरचंद गेहलोत म्हणाले, टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारताने मोठी कामगिरी केली आहे. भारतीयांमध्ये गुणवत्ता आहे. परंतु त्या गुणवत्तेचा योग्य वापर होत नाही. पदवी घेऊन बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा इतरांना रोजगार मिळेल, अशा पद्धतीने काम करावे, असे विचार त्यांनी मांडले.
बुश्रा मतीनला 16 सुवर्णपदके
यंदाच्या पदवीदान समारंभावर रायचूर येथील बुश्रा मतीन या विद्यार्थिनीची छाप दिसून आली. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलेल्या बुश्रा हिला तब्बल 16 सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. खुद्द राज्यपाल व लोकसभेच्या अध्यक्षांनी बुश्राचे कौतुक केले. पुढील काळात युपीएससी करून सिव्हिल सर्व्हिसमध्ये सेवा करण्याची इच्छा बुश्राने व्यक्त केली.
सरकारी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्याने मिळविली सात सुवर्ण
हुदली येथील सरकारी शाळेत शिकलेल्या विवेक भद्रकाली याला सात सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. विवेक केएलईच्या डॉ. एम. एस. शेषगिरी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे. यावषीच्या पदवीदान समारंभात बेळगावमधील सर्वाधिक सुवर्ण घेणारा तो विद्यार्थी ठरला आहे. विवेक सध्या युपीएससीची तयारी करत आहे.
तिघांना मानद डॉक्टरेट
यावषीच्या पदवीदान समारंभात विविध क्षेत्रात कार्य करणाऱया व्यक्तींना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले. बेंगळूर येथील इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक सेनापती गोपालकृष्णन्, पद्मभूषण प्राप्त व हैदराबाद येथील भारत बायोटेकचे चेअरमन डॉ. कृष्णा इल्ला, बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसच्या प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले.