कागल / प्रतिनिधी
स्कार्पिओ आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला.या अपघातात निखिल राजू शिंदे (वय २६) हा जागीच ठार झाला तर मनोज मयुर बिदरभावी (वय १८) जखमी झाला आहे. दोघे उचगाव मणेरमळा येथील आहेत. ही घटना कागल – निढोरी रोडवरील आर. के.भवन मंगल कार्यालयासमोर आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्कार्पिओचालक घटनास्टाळी गाडी सोडून पळून गेला.
निखिल शिंदे हा औषध कंपनीत औषध विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होता. आज दुपारी तो मोटरसायकलीवरून मनोज बिदरभावी या मित्रासह कागल तालुक्यातील पिंपळगांव बुदूक येथील डॉक्टरांना औषधे देण्यासाठी गेला होता. औषध देऊन दोघेजण मोटरसायकलीवरून कागलच्या दिशेने चालले होते. यावेळी कागलहून निढोरीच्या दिशेने भरधाव वेगात स्कार्पिओ चालली होती. बामणी ते शेंडूर फाटा दरम्यान असलेल्या आर . के . भवन मंगल कार्यालयासमोर मोटरसायकल आणि स्कार्पिओ यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोटरसायकलस्वार निखिल शिंदे याचा जागीच मृत्यू झाला.
तर मनोज बिदरभावी हा किरकोळ जखमी झाला. या अपघातात स्कार्पिओच्या उजव्या बाजूची पुढील टायर फुटली. तर मोटरसायकलीच्या पुढील चाकाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर स्कार्पिओ चालकाने गाडी घटनास्थळी उभी करून पलायन केले. कागल पोलिसांनी भेट दिली. पंचनामा करून शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. कागल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.