फ्रान्सचा नागरिक असणाऱया रेमी ओव्हार्ड याने नवा जागतिक विक्रम केला आहे. त्याने आकाशात जमिनीपासून 3600 मीटर उंचीवर (साधारणतः साडेतीन कि. मी.) हॉट एयर बलूनच्या साहाय्याने तब्बल दीडतास उड्डाण केले आहे. हॉट एयर बलूनवर बसून त्याने हा विक्रम केला आहे. हे विशेष मानले जात आहे. त्यावेळी तापमान अवघे 17.6 डिग्री फॅरनहाईट इतके होते. त्याचे वडील जीन डॅनियल ओव्हार्ड हे जमिनीवरून हा बलून उडवत होते आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवीत होते. रेमी हा स्टंटमन असून त्याने पश्चिम फ्रान्समधील एका स्थानी हा विक्रम केला. विक्रमाचा उद्देश मज्जा संस्थेच्या एका अति दुर्मिळ विकारावर औषध शोधून काढण्यासाठी धन गोळा करणे हा होता. मानव हिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणाऱया या कारणासाठी त्याने अक्षरशः त्याचा जीव धोक्यात घातला.
या स्टंटची तयारी त्याने तीन वर्षांपूर्वीपासून केली होती. बलूनला स्वतःला बांधून घेण्याऐवजी बलूनवर बसून त्याने हे उड्डाण केले. बलूनच्या हेलकाव्यांमुळे तोल जाऊ नये यासाठी त्याने विशेष व्यवस्था केली होती. तरीही त्याचा हा स्टंट धोकादायकच होता. थोडी चूक झाली असती तरी जीवाशी खेळ होता. पण एका सकारात्मक कार्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याने त्याचे फ्रान्स आणि युरोपमध्ये मोठेच कौतुक होत आहे. पुढील वर्षी याहीपेक्षा थरारक विक्रम करण्याची त्याची योजना असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. बलूनवर बसून इतके उंच उड्डाण करण्याचा अनुभव अक्षरशः अभुतपूर्व होता, असे त्याने नंतर स्पष्ट केले.