कराड / प्रतिनिधी :
कराड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री जेरबंद केले. या टोळीकडून देशी बनावटीची 14 पिस्टल तसेच 22 जिवंत काडतुसे असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीमध्ये कराड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश असून काही बाहेरील जिल्ह्यातील आहेत. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील, अशी शक्यता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वर्तवली आहे.
28 मार्च रोजी उपअधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कराड शहरात कोंबींग ऑपरेशन राबवित असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत राजमाची (ता कराड) गावच्या हद्दीत कराड ते विटा रोडवर जानाई मळाई मंदिराजवळ, रस्त्याचे बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या जवळ काही इसम जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील पथकास याबाबत माहिती देवुन सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार असे 2 पंचांसह प्राप्त माहितीच्या ठिकाणी लगेच रवाना झाले. संबंधित ठिकाणी उसाच्या शेतालगत आडोशास सुमारे 8 ते 10 इसम उभे असल्याचे दिसले. नमुद इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमुद इसमांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून 9 लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे, मिरची पुड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला. त्यांचे विरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस दरोडा टाकण्याचे पुर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सनी उर्फ गणेश शिंदे रा. ओगलेवाडी ता. कराड, अमित हणमंत कदम रा. अंतवडी ता. कराड , अखिलेश सुरज नलवडे रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड,धनंजय मारुती वाटकर रा.सैदापूर कराड, वाहीद बाबासाो मुल्ला रा. विंग ता. कराड, रिजवान रज्जाक नदाफ रा. मलकापूर, चेतन शाम देवकुळे रा. बुधवार पेठ महात्मा फुलेनगर कराड, बजरंग सुरेश माने रा. बुधवार पेठ कराड, हर्ष अनिल चंदवाणी रा. मलकापूर, तुषार पांडूरंग शिखरे रा. हजारमाची कराड या दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
अधीक्षक समीर शेख, अपर अधीक्षक बापू बांगर, उप अधीक्षक रणजित पाटील यांच्या सूचनेप्रमाणे अजय कोकाटे परि. पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.