पाच वर्षांमधील चार सरकारी कंपन्यांच्या आकडेवारीचा समावेश ः कॅगच्या अहवालात माहिती समोर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार विमा कंपन्या (पीएसयू) यांना मागील पाच वर्षाच्या दरम्यान आरोग्य विमा व्यवसायात जवळपास 26,364 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी आपल्या अहवालामध्ये दिली आहे.

सदरच्या अहवालामधून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचा आरोग्य विमा या घटकाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले असून यातून लाभ घटला आहे. या कारणास्तव एकूण नुकसान आणखीन वाढल्याचे सांगितले आहे.
आर्थिक वर्ष 2016-17 ते 2020-21 च्या दरम्यान या चार सार्वजनिक विमा कंपन्यांमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एनआयएसीएल), युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (युआयआयसीएल), ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ओआयसीएल) आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एनआयसीएल) यांचे एकूण नुकसान जवळपास 26,364 कोटी रुपयांवर राहिले होते.
वाहन क्षेत्र प्रथम स्थानी
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसाठी आरोग्य विमा दुसरे सर्वात मोठे व्यवसाय क्षेत्र आहे. पहिल्या स्थानी वाहन विमा क्षेत्र असून या क्षेत्राचे मागील पाच वर्षांमध्ये प्रत्यक्ष प्रीमियम 1,16,551 कोटी रुपयांवर राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी घटत आहे
आरोग्य विमा व्यवसायामध्ये सरकारी विमा कंपन्यांची बाजारातील हिस्सेदारीही खासगी कंपन्यांच्या तुलनेत घटत राहिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. यासोबतच समूह आरोग्य विमा विभागात या कंपन्यांचे एकत्रित प्रमाण 125 ते 165 टक्के असल्याचे ऑडिटमध्ये यावेळी आढळून आले.