सुरतकलमध्ये भररस्त्यात पाठलाग करून खून : सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर कैद
प्रतिनिधी /बेंगळूर
मंगळूर जिल्हय़ातील बेळ्ळारे (ता. सुळय़) येथील भाजपचे युवानेते प्रवीण नेट्टारू हत्येची घटना ताजी असतानाच गुरुवारी आणखी एका युवकाची धारधार शस्त्रास्त्राने हल्ला करून खून करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री मंगळूर शहराबाहेरील सुरतकलमधील एस. के. मोबाईल दुकानजवळ ही घटना घडली आहे. फाझील (रा. सुरतकलजवळील मंगळपादे) असे मृताचे नाव आहे. तीन युवकांच्या गटाने पाठलाग करत त्याच्यावर भररस्त्यामध्ये शस्त्रास्त्रांनी हल्ला करून खून केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर फाझील याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच सुरतकल स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खबरदारीसाठी सुरतकल येथील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर व्हिडीओमध्ये भररस्त्यातच हल्ला झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मंगळवारी रात्री प्रवीण नेट्टारु याचा बळ्ळारेनजीकच्या पेरुवाजे येथील चिकन दुकान बंद करून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी प्रवीण त्यांच्यावर हल्ला करून हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच दुसऱया दिवशी मंगळूर जिल्हय़ातच आणखी एकाचा खून करण्यात आल्याने राज्यात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान या हत्यांनंतर अनेक ठिकाणी आंदोलन झाली असून मंगळूर जिल्हय़ात दोन दिवस जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
नागरिकांनी शांतता राखावी, हल्लेखोरांवर कारवाई करणार!
सुरतकल येथे झालेल्या निर्घृण हत्येचा मी तीव्र निषेध करतो. गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य पोलिसांना दिले आहे. नागरिकांनी शांततेने सहकार्य करावे.
– अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री