महिला टी-20 विश्वचषक : भारताची झुंजार लढत, गार्डनरची अष्टपैलू चमक, हरमनप्रीत-जेमिमाचे प्रयत्न अपुरे

वृत्तसंस्था /केपटाऊन
निष्प्रभ गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण झाल्यानंतरही भारतीय महिला फलंदाजांनी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतावर केवळ 5 धावांनी रोमांचक विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. 18 चेंडूत 31 धावा आणि 37 धावांत 2 बळी मिळविणाऱया अष्टपैलू ऍश्ले गार्डनरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.
भारतीय महिलांच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने प्रथम खेळताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 172 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर बेथ मुनीने 54 तर कर्णधार मेग लॅनिंगने नाबाद 49 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताला 20 षटकांत 6 बाद 167 धावांवर रोखत ही रोमांचक ठरलेली लढत 5 धावांनी जिंकून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली असून सहाव्या जेतेपदाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. शुक्रवारी इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून यातील विजयी संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाची अंतिम लढत होईल.
भारताला शेवटच्या 3 षटकांत 31 धावांची गरज असताना त्यांना 25 धावाच जमविता आल्या. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना स्पिनर गार्डनरने अचूक मारा करीत केवळ 10 धावा दिल्याने ऑस्ट्रेलियाला 5 धावांनी विजय मिळाला. भारतातर्फे कर्णधार हरमनप्रीतने 34 चेंडूत सर्वाधिक 52 धावा जमविल्या. दुर्दैवाने ती धावचीत झाल्यामुळे भारताच्या आशेवर पाणी पडले. तिने व जेमिमा रॉड्रिग्सने 6.4 षटकांत 69 धावांची भागीदारी करून भारताचे आव्हान जिवंत ठेवले होते. पण नंतरचे फलंदाज उत्तुंग फटके मारण्याच्या नादात बाद झाले. दीप्ती शर्माला मोठे फटके मारण्यात पुन्हा एकदा अपयश आले. तिने 17 चेंडूत 20 धावा काढल्या.
मुनी, गार्डनरची फटकेबाजी

बेथ मुनीने भारताविरुद्ध पुन्हा एकदा चमकदार प्रदर्शन करीत 37 चेंडूत 54 धावा फटकावल्या. सर्वोत्तम पॉवरहिटर्सपैकी एक असणाऱया ऍश्ले गार्डनरने जोरदार फटकेबाजी करीत केवळ 18 चेंडूत 31 धावा फटकावल्या तर कर्णधार लॅनिंगने 34 चेंडूत नाबाद 49 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर ऍलीसा हिली व बेथ मुनी यांनी 7.3 षटकांत 52 धावांची अर्धशतकी सलामी दिली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता होती. आदल्या दिवशी तिला ताप आला होता. तरीही तिने या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी स्विंग गोलंदाजीस अनुकूल नसल्याने रेणुका सिंग ठाकुरला धावा रोखणे व बळी मिळविणे कठीण गेले. तिचा पहिलाच चेंडू हाफ व्हॉली होता आणि त्यावर ऍलीसा हिलीने चौकार ठोकला. हिलीने 26 चेंडूत 25 धावा जमविल्या. हिली नेहमी मुनीपेक्षा आक्रमक खेळ करते. पण या सामन्यात मुनी जास्त आक्रमक खेळत होती. 52 धावांच्या भागीदारीत मुनीने अधिक चौकार मारले. स्पिनर्सविरुद्ध तिने पदलालित्याचा वापर करीत समर्थपणे मुकाबला केला. मुनी 32 धावांवर असताना शेफाली वर्माने लाँगऑनवर तिचा सोपा झेल सोडला.
या स्पर्धेत आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या दीप्ती शर्माने सुरुवातीच्या स्पेलमध्ये अनेकदा शॉर्ट चेंडू टाकले. तिच्या दुसऱया षटकात 12 धावा निघाल्या. मुनीने तिला लाँगऑफच्या दिशेने अप्रतिम षटकार मारला. दिशा व टप्पा यातील सातत्याचा अभाव आणि गचाळ क्षेत्ररक्षण यामुळे ऑस्ट्रेलियाला भरपूर धावा मिळाल्या. लॅनिंगलाही सुरुवातील जीवदान मिळाले. त्याचा लाभ घेत तिने नाबाद 49 धावा फटकावल्या. रेणुकाने टाकलेल्या 20 व्या षटकात तिने 2 षटकार व एक चौकार वसूल केला. महागडी ठरलेल्या रेणुकाने एकही बळी न मिळविता 41 धावा दिल्या. पूजा वस्त्रकारच्या जागी खेळणाऱया स्नेह राणाला चांगली गोलंदाजी करूनही बळी मिळाला नाही. तिने फ्लायटेड चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बराच त्रास दिला. तिच्या पहिल्याच षटकात लॅनिंगचा बळी मिळाला असता. पण यष्टिरक्षक रिचा घोषने हा झेल सोडला. नंतर रिचाने एकदा लॅनिंगला यष्टिचीत करण्याची संधीही दवडली. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या पाच षटकांत 59 धावांची बरसात करीत भारतासमोर कठीण आव्हान ठेवले. भारतातर्फे शिखा पांडेने 2 तर दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलियन महिला 20 षटकांत 4 बाद 172 : ऍलिसा हिली 25 (26 चेंडूत 3 चौकार), बेथ मुनी 54 (37 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), मेग लॅनिंग नाबाद 49 (34 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), ऍश्ले गार्डनर 31 (18 चेंडूत 5 चौकार), ग्रेस हॅरिस 7, एलीस पेरी नाबाद 2, अवांतर 4. गोलंदाजी : शिखा पांडे 2-32, दीप्ती शर्मा 1-30, राधा यादव 1-35, स्नेह राणा 0-33, रेणुका सिंग 0-41.
भारत्नीय महिला 20 षटकांत 6 बाद 167 : शेफाली वर्मा 9, स्मृती मानधना 2, यास्तिका भाटिया 4, जेमिमा रॉड्रिग्स 43 (24 चेंडूत 6 चौकार), हरमनप्रीत कौर 52 (34 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), रिचा घोष 14 (17 चेंडूत 1 चौकार), दीप्ती शर्मा नाबाद 20 (17 चेंडूत 2 चौकार), स्नेह राणा 11 (10 चेंडूत 1 चौकार), राधा यादव 0, शिखा पांडे नाबाद 1, अवांतर 11. गोलंदाजी : ऍश्ले गार्डनर 2-37, डार्सी ब्राऊन 2-18, जेस जोनासन 1-22, मेगन स्कट 1-34.