प्रतिनिधी /बेळगाव
’स्वर मल्हार फौंडेशन’ बेळगावतर्फे शनिवार दि. 10 रोजी अद्रीजा बसू आणि अलिक सेनगुप्ता, कोलकाता या दांपत्याच्या बहारदार गायनाची बैठक संपन्न झाली.
सुरुवातीला अद्रीजा यांनी राग मुलतानीमध्ये गोकुल गाव का छोरा ही विलंबित त्रिताल आणि त्यानंतर नैनन में आन बान ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. आपल्या गायनाची समाप्ती राग कामोदमधील दोन बंदिशी गाऊन केली.
स्वच्छ, निकोप, सुरेल आवाज आणि रागांची शिस्तपूर्ण मांडणी यामुळे त्यांनी रसिकांची दाद मिळविली. त्यांना नारायण गणाचारी आणि सारंग कुलकर्णी यांनी तितकीच रंगतदार साथसंगत दिली. तानपुरा साथ तन्मयी सराफ हिने केली.
बैठकीचे दुसरे कलाकार होते अलिक सेनगुप्ता. अलिक यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग जोगकंसने केली. ’सुघर वर पाया’ ही विलंबित एकतालातील आणि त्यानंतर ’पिर पराई’ ही दृत तीन तालातील बंदिश अतिशय तयारीने सादर केली. त्यानंतर राग गौड मल्हारमध्ये मध्य लय तीन तीन तालातील बंदिश आणि त्यानंतर एक तराना सादर केला.
बैठकीचे समापन भैरवीतील ’तुम हो जगत के दाता’ या भजनाने केली. ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्यांची शिस्तबद्ध मांडणी, भारदस्त आणि तितकाच लवचिक आवाज यामुळे अलिक यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संतोष पुरी आणि सारंग कुलकर्णी यांची सुयोग्य साथसंगत लाभली. सुरुवातीला अद्रीजा आणि अलिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार तसेच कलाकारांचा परिचय रोहिणी कुलकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.