ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी झालेल्या राडय़ादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात (Balgandharva Rangmandir, pune) स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी सभागृहात आगोदरच उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. पण त्याचवेळी भाजप कार्यकर्त्याकडून वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, भाजपच्या एका भगवी टोपी घातलेल्या कार्यकर्त्याने नागवडे यांच्यावर हात उगारल्याचे दिसत आहे.
इराणी त्यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निषेध केला आहे. महागाईच्या मुद्यावर त्यांनी बोलावं अशी मागणी करत सकाळी हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट येथे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत, फलक हातात घेऊन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. इराणी यांचा ताफा बालगंधर्वच्या बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचा आणि काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं.