प्रतिनिधी / बेळगाव
पारंपरिक शिवजयंती उत्सवानिमित्त काढण्यात येणारी भव्य चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. 27 रोजी निघणार आहे. यानिमित्त अनेक मार्गांवरील वाहतूक मिरवणुकीच्या काळात वळविण्यात येणार आहे. यासंबंधी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. शनिवारी पारंपरिक शिवजयंती मिरवणूक निघणार आहे. नरगुंदकर भावे चौकापासून मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर पूलमार्गे कपिलेश्वर देवस्थानासमोर मिरवणुकीची सांगता होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी 2 ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा सर्कलहून कॉलेज रोडमार्गे खानापूर रोडकडे जाणारी वाहने चन्नम्मा गणेश मंदिराच्या पाठीमागे वळवून क्लब रोड, महात्मा गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल), केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कत पार्क, ग्लोब थिएटरमार्गे खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहे. जिजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोलपंप, नरगुंदकर भावे चौक, कांबळी खूट, पिंपळकट्टा, पाटील गल्लीकडे जाणारी वाहने जिजामाता सर्कलहून जुन्या पी. बी. रोडकडे वळविण्यात येणार आहेत. गोवावेस सर्कल व नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडिया, कपिलेश्वर पुलाकडे जाणारी वाहतूक बँक ऑफ इंडियाजवळ वळविण्यात येणार असून तेथून शिवसृष्टी, कुलकर्णी गल्ली, वैभव हॉटेल क्रॉस, जुन्या पी. बी. रोडकडे वळविण्यात येणार आहे.
जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टिक, भातकांडे स्कूलमार्गे कपिलेश्वर उ•ाणपुलाकडे जाणारी वाहतूक भातकांडे स्कूलपासून डाव्या बाजूला वळवून शिवाजी उद्यान, बँक ऑफ इंडिया क्रॉस, महात्मा फुले रोडमार्गे वळविण्यात येणार आहे. जुना पी. बी. रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिरसमोरील वाहतूक कपिलेश्वर पुलावरून यश हॉस्पिटलजवळ वळविण्यात येणार आहे. पुढे ती भातकांडे स्कूल किंवा तानाजी गल्ली रेल्वेगेटमार्गे वळविण्यात येणार आहे. गुड्सशेड रोडमार्गे कपिलेश्वर पुलाकडे येणारी वाहतूक एसपीएम रोडकडे न जाता मराठा मंदिर, गोवावेस सर्कलमार्गे नेण्याचे आवाहन केले आहे. खानापूर रोड, बीएसएनएल क्रॉस, स्टेशन रोड, गोगटे सर्कलहून रेल्वेस्थानक, पोस्टमन सर्कलमार्गे शनिमंदिरकडे जाणारी वाहने ग्लोब थिएटरजवळ अडविण्यात येणार आहेत. या मार्गावरील वाहतूक शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, महात्मा गांधी सर्कल, क्लब रोड, चन्नम्मा सर्कलमार्गे वळविली आहे.