गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथील घटना, चोरट्यांनी गोडावूनची भिंत पाडली
प्रतिनिधी/मिरज
शहरातील गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे दारु गोडावूनची भिंत पाडून 35 लाख, 741 रुपयांची विदेशी दारु चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली. याप्रकरणी विजय किसन निकम (वय 44, रा. अभिमान ऍसेट, विश्रामबाग) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. मोठय़ा औद्योगिक वसाहतीत गोडावून फोडून लाखोंची दारु लंपास करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे फ्लॉट नं. 96 व 97 मध्ये एम्पायर स्पिरीट इंडीया नावाचे विदेशी दारुचे गोडावून आहे. विजय निकम हे या गोडावूनचे व्यवस्थापक आहेत. या गोडावूनमध्ये लाखो रुपयांची दारु होती. गुरूवारी सायंकाळी सहानंतर सदर गोडावून बंद करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी सदर गोडावूनची कशाने तरी फोडून आत प्रवेश केला. व गोडावूनमधील सिग्राम कंपनीच्या विस्की दारुच्या बाटल्या असलेले 348 बॉक्स अशी सुमारे 35 लाखांची दारू चोरून नेली.