सकाळी 8 ते 11 पर्यंत शहरात बंदी कॅम्पमध्ये तीन ठिकाणी गतिरोधक
प्रतिनिधी / बेळगाव
तीन दिवसांत अवजड वाहनांनी दोन विद्यार्थ्यांना चिरडले आहे. या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली असून लगेच शहरात अवजड वाहतूक बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 8 ते 11 पर्यंत बेळगाव शहरात प्रवेश करणारी अवजड वाहने शहराबाहेरच अडविण्यात आली. तर बुधवारच्या अपघातानंतर कॅम्प परिसरात तीन ठिकाणी गतिरोधक बसविले आहेत.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या पुढाकारातून काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुरुवारी पोलीस मुख्यालयात वेगवेगळय़ा संघटनांचे पदाधिकारी व पालकांची बैठक झाली.

या बैठकीत अवजड वाहतूक बंदीची मागणी करण्याबरोबरच ज्या मार्गावर शाळा, कॉलेज आहेत, त्या मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली.
बुधवारी सकाळी भरधाव ट्रकने चिरडल्याने अरहान बेपारी (वय 10) हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याची बहीण हफ्सा (वय 18) व आयुष आजरेकर (वय 12) हे दोघे जण जखमी झाले. ज्या ठिकाणी बुधवारचा अपघात घडला त्या परिसरात गतिरोधक बसविण्यात आले आहेत. फिश मार्केटपासून महावीर जनरल स्टोअर्सपर्यंत तीन गतिरोधक बसविण्यात आले.
बुधवारी संतप्त नागरिकांनी पोलीस व प्रशासनाला धारेवर धरले होते. गुरुवारी सकाळी कॅम्प परिसरातील नागरिकांनी वेलकम हॉटेलजवळ निदर्शने केली. अपघातात शाळकरी मुलाचा बळी जाऊनही प्रशासनाला जाग आली नाही, असा आरोप करीत नागरिक एकवटले. त्यानंतर लगेच काही पालकांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
पोलीस मुख्यालयात उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी आदींच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत कॅम्प परिसरातील नागरिकांबरोबरच वेगवेगळय़ा संघटनांच्या पदाधिकाऱयांनीही भाग घेतला होता. सुनील जाधव, परवेज किणीकर, सोनाली खोत, संतोष घाटगे, राजशेखर तोरगल, मोनोसिंग, रिजवान बेपारी, नदीफ फत्तेखान, प्रियांका जैन, सुनीलकुमार पोळ, गायत्री सावंत, रकमा गोलबा, शकील मुल्ला आदींसह अनेकांनी प्रशासनाला परिस्थिती सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी सूचना केल्या.
यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा म्हणाल्या, दुर्घटना टाळण्यासाठी रोज सकाळी 8 ते 11 पर्यंत व दुपारी 2 ते 6 पर्यंत अवजड वाहतूक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. यासंबंधी आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून वेग कमी केल्यासंदर्भात एक-दोन दिवसांत अधिकृत आदेश जारी करण्यात येणार आहे.
शाळा-कॉलेज परिसरात वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. मात्र केवळ पोलीस तैनात करून समस्या सुटणार नाही. त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱयांशी चर्चा करून शाळा-कॉलेज प्रशासनानेही आपल्या शाळेजवळ वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी उभे करावेत, अशी सूचना करण्यात येणार आहे. बुधवारची घटना दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

पिरनवाडीजवळ वाहनांच्या रांगा
अवजड वाहतूक बंदीची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे पिरनवाडीजवळ गुरुवारी सकाळी 11 पर्यंत 150 हून अधिक वाहने उभी होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. केवळ पिरनवाडीच नव्हे तर काकती, हलगा व शहरात प्रवेश करणाऱया इतर प्रमुख मार्गांवरही गुरुवारी सकाळी पोलीस तैनात करण्यात आले होते. बॅरिकेडस् उभे करून अवजड वाहतूक रोखली होती. मुलांच्या शाळेच्या वेळा लक्षात घेऊन 9 ऐवजी सकाळी 8 पासून वाहतूक बंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान वेगवेगळय़ा संघटना व पालकांच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाहनचालकांची तारांबळ
गुरुवारी सकाळपासून अचानक अवजड वाहतूक बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. कोरोनाकाळात या आदेशाची अंमलबजावणी थांबविण्यात आली होती. कॅम्प परिसरात झालेल्या अपघातानंतर पुन्हा सुरू झाली आहे. यासाठी 4 ते 5 वाहतूक पोलीस पिरनवाडी परिसरात दाखल झाले. सकाळी 8 पासूनच वाहने अडविण्यात येत होती. त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. कसलीच पूर्वकल्पना न देता वाहने अडविण्यात आली आहेत. किमान आधी त्याची कल्पना दिली असती तर सकाळी 8 च्या आधीच आम्ही आमची कामे उरकली असती, अशा शब्दात ट्रक चालकांनी आपली नाराजी व्यक्त केली.