ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला. त्यानंतर काही तासातच राष्ट्रवादीने कोश्यारींचे उपहासात्मक अधोगती पुस्तक ट्विट करत त्यांना डिवचले. या अधोगती पुस्तकात कोश्यारींना इतिहासात शून्य गुण दाखविण्यात आले आहेत. तसेच या अधोगती पुस्तकासोबत एक पत्रही जोडले आहे.
राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन “जनहितार्थ जारी” नावाने हे ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये असलेल्या प्रगती पुस्तकाला अधोगती पुस्तक म्हटले आहे. त्यावर विविध विषयांवरील त्यांचे गुण दाखवण्यात आले आहेत. कोश्यारी यांची तुकडी ‘ढ’ तर हजेरी क्रमांक 42* असा नमूद करण्यात आला आहे. इतिहास विषयात शून्य, भूगोलात 35, नागरिकशास्त्रात 17, सामान्यज्ञानात 34 तर कला विषयात त्यांना 100 पैकी 100 मार्क देण्यात आले आहेत. कोश्यारींनी राष्ट्रपुरुषांवर केलेल्या वादग्रस्त विधानांवरून त्यांना इतिहासात शून्य गुण देण्यात आले आहेत.
या अधोगती पुस्तकासोबत राष्ट्रवादीने एक पत्रही जोडले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,
प्रति,
मुख्याध्यापक,
पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे.
सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून, मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी ही विनंती.
आपला नम्र मुख्याध्यापक
व्हॉटस्ॲप विद्यालय