भाजप अन् काँग्रेसविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नानुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली आहे. भुवनेश्वरमध्ये बिजू जनता दलाचे अध्यक्ष पटनायक यांच्याशी चर्चा केल्यावर ममतादीदींनी आम्ही संघीय व्यवस्थेला मजबूत करण्याचा संकल्प घेतला असल्याचे विधान केले आहे. ममतादीदींसोबत गंभीर राजकीय विषयांवर विस्तृत चर्चा झालेली नाही. आम्हा दोघांमध्ये खूप जुने मैत्रीसंबंध आहेत असे पटनायक यांनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी किंवा प्रादेशिक आघाडी निर्माण होण्याच्या शक्यतेसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देणे टाळले आहे. तत्पूर्वी पटनायक यांनी तृणमूल काँग्रेस प्रमुखांना तिन्ही रथांची प्रतिकृती भेट करत त्यांचे स्वागत केले होते. पुरी या तीर्थक्षेत्री येणाऱया भाविकांना वास्तव्याची सुविधा मिळावी म्हणून ‘बंगाल निवास’च्या निर्मितीकरता श्री जगन्नाथ मंदिरानजीक एका भूखंडाची निवड केली आहे. पुरी-ब्रह्मागिरि मार्गावरील हा भूखंड 12 व्या शतकातील मंदिरापासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.