ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रचारसभेत महाविकास आघाडीत मतभेद आहेत की काय? अशी शंका आता कसब्यातील काँग्रेस उमेदवाराच्या बॅनरवरुन निर्माण झाली आहे.
पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. तर कसबा पेठमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, कसब्यातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रचारासाठी धंगेकर यांनी कसबा पेठमध्ये काही बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर अशोक चव्हाण, नीलम गोऱ्हे, विश्वजित कदम, राजेंद्र गवई यांचे फोटो आहेत. तसेच काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची नावे आहेत. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर कुठेही नसल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रचारसभेत आघाडीत मतभेद आहेत की काय? अशी शंका आता निर्माण होत आहे.