पन्नीरसेल्वम यांची पक्षातून होणार हकालपट्टी ः बैठकीपूर्वी दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापट
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये सोमवारी झालेल्या अण्णाद्रमुकच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली. सर्वसाधारण सभेत पलानिसामी हेच अण्णाद्रमुकचे अंतरिम महासचिव असतील असा निर्णय घेण्यात आला. यानंतर पलानिसामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेण्याचा प्रस्ताव संमत झाला आहे.
भारतात केवळ अण्णाद्रुमक हाच एकमेव पक्ष लोकशाहीच्या मार्गाने काम करत आहे. माझे प्रामाणिक कार्य पाहून जयललिता यांनी महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी दिली होती. मंत्री म्हणून काम करताता मी अनेक योजना सुरू केल्या होत्या. परंतु आता द्रमुक नेते आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे या योजनांवर स्टिकर चिकटवून स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोप पलानिसामी यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला. तसेच त्यांनी अण्णाद्रमुकच्या खजिनदारपदी डिंडुकल श्रीनिवासन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. हे पद पूर्वी पन्नीरसेल्वम यांच्याकडे होते.

स्टॅलिन अन् पन्नीरसेल्वम यांचा कट
सर्वसाधारण सभेपूर्वी आम्ही पक्ष मुख्यालयासाठी सुरक्षेची मागणी केली होती. आमच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी सुरक्षा पुरविली नाही. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि ओ. पन्नीरसेल्वम या दोघांनी मिळून अण्णाद्रमुक कार्यालय उद्ध्वस्त करण्याचा कट रचला असल्याचे पलानिसामी म्हणाले.

न्यायासाठी लढणार ः ओपीएस
तर दुसरीकडे ओ. पन्नीरसेल्वम यांनी ई. पलानिसामी आणि के.पी. मुनुसामी यांना पक्षातून बडतर्फ केल्याची घोषणा केली आहे. सर्वसाधारण सभेत माझ्या हकालपट्टीचा घेतलेला निर्णय वैध नाही. आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. मला पदावरून हटविण्याचा अधिकार त्यांना नाही. पक्षाच्या 1.5 कोटी कार्यकर्त्यांनी माझी समन्वयक म्हणून निवड केली आहे. कार्यकर्त्यांना भेटून मी न्याय मागणार असल्याचे पन्नीरसेल्वम यांनी म्हटले आहे.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
-पेरियार, एम.जी रामचंद्रन आणि जयललिता यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव
-पक्षातील दुहेरी नेतृत्व समाप्त, आता महासचिव पदानंतर उपमहासचिव पद असणार
-महासचिव निवडण्यासाठी संघटनात्मक निवडणूक पुढील 4 महिन्यांमध्ये पार पडणार
-अण्णाद्रमुकने समन्वयक आणि संयुक्त समन्वयक ही दोन्ही पदे संपुष्टात आणली
पक्षाच्या दरवाजांची तोडफोड
अण्णाद्रमुक मुख्यालयानजीक ओ. पन्नीरसेल्वम आणि ई. पलानिसामी यांच्या समर्थकांमध्ये जोरदार झटापट झाली. पन्नीरसेल्वम यांनी सर्वसाधारण सभेच्या बैठकीला स्थगिती देण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने पलानिसामी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱया या बैठकीला मंजुरी दिली होती. याचमुळे दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापट सुरू झाली. पक्ष कार्यालयाच्या बाहेर दोन्ही गटांमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला. बैठकीदरम्यान मुख्यालयात शिरण्यासाठी कार्यालयाचे दरवाजेही तोडण्यात आले. या घटनेदरम्यान काही जण जखमी झाले आहेत.
सरकारकडून पक्षकार्यालय सील
तामिळनाडूतील अण्णाद्रमुक कार्यालयात तसेच बाहेर हिंसक झटापट तसेच तोडफोड झाल्यावर प्रशासनाने सोमवारी पक्ष मुख्यालय सील केले आहे. पक्षकार्यालयात असलेल्या सर्व लोकांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. तसेच संबंधित परिसरात जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.