ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची येत्या 1 मे ला औरंगाबादेत (aurangabad) सभा होणार आहे. मात्र, मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या सभेला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. उलट 26 एप्रिल ते 9 मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या (raj thackreay) सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
1 मे ला औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरेंची सभा होणार असल्याचे मनसेने जाहीर केले होते. त्यासाठी तयारीही सुरु केली होती. रविवारी सभेच्या ठिकाणी पूजन करून व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली होती. मात्र, पोलिसांच्या आदेशामुळे या सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सभेला परवानगी मिळाली नसली तरीही राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारीला लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.
मनसेने औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेचा टीझरही रिलीज केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा टीझर रिलीज केला आहे.