आर्मेनियात तयार होते जगातील सर्वात मोठी रोटी

आपण घरांमध्ये दररोज भाजी-भाकरी खात असतो. या भाकरीचा आकार सर्वसाधारणपणे एकसारखाच असतो. परंतु जगात एका ठिकाणी सर्वात मोठी भाकरी म्हणजेच रोटी तयार केली जाते. ही रोटी एक नव्हे तर 2 लोकांचे पोट एकाचवेळी भरू शकते. याच्या याच वैशिष्टय़ामुळे युनेस्कोने या रोटींना कल्चरल हेरिटेजचा दर्जा दिला आहे. या रोटी तयार करण्यासाठी विशेष तंदूर तयार केले जातात. जगातील या सर्वात मोठय़ा रोटीचे नाव लवाश आहे. आर्मेनियात शतकांपासून याची निर्मिती केली जात आहे. भारतात तयार होणाऱया रोटीच्या तुलनेत लवाश रोटी आकाराने 8 पट मोठी आहे. लवाश रोटी आकाराने अंडाकृती असते, जी प्रथम विशेष तंदूरमध्ये तयार केली जाते आणि मग दुमडून ठेवली जाते. भूक लागल्यावर ती गरम करत खाण्यात येते. आर्मेनियासोबत ही रोटी इराण, अझरबैजान, किर्गिस्तान आणि तुर्कियेत देखील लोकप्रिय आहे. गव्हाचे पीठ, पाणी, साखर आणि मीठाचा वापर करून ती तयार केली जाते. फरशीवर लाटून त्यानंतर यात अफीमचे बीज तसेच तीळ ओतून तंदूरमध्ये ती भाजली जाते.

एक वर्षापर्यंत खाण्यायोग्य
लवाश रोटी अत्यंत रुचकर आणि मऊ असते. तर ती कोरडी झाल्यावर कडक होऊ तुटू लागते. याचमुळे ती गरमागरम खाणे चांगले मानले जाते. परंतु ही रोटी आता पॅक करून दुकानांमध्येही विकण्यात येते. याकरता लवाश रोटींना फोल्ड करून रॅप करत पॅक करण्यात येते. यानंतर वर्षभर या रोटी खाण्यायोग्य असतात. आर्मेनियाच्या गावांमध्ये ही रोटी खाण्याकरता दुसरी पद्धतही वापरली जाते. तेथे कडक झालेल्या लवाश रोटी एकावर एक अशा स्वरुपात ठेवल्या जातात. ज्यानंतर एखाद्याला भूक लागल्यावर तो कडक रोटी बाहेर काढत त्यात सौम्य स्वरुपात पाणी शिंपडतो. यामुळे ही रोटी पुन्हा खाण्यायोग्य होते. अनेक देशांमध्ये यात गोड खाद्यपदार्थ घातले जातात. तर मध्यपूर्वेतील देश ही रोटी कबाबसोबत खात असतात. युनेस्कोने लवाश रोटीला आर्मेनियाची देणगी मानत तिला स्वतःच्या कल्चरल हेरिटेज लिस्टमध्ये सामील केले आहे. युनेस्कोच्या या निर्णयाला शेजारी देशांनी विरोध देखील केला होता. इराण, किर्गिस्तान, कजाकस्तान, अझरबैजान आणि तुर्कियेने लवाश रोटी ही आर्मेनियाची देणगी नसल्याचे म्हटले होते.