निपाणी : 2018 प्रमाणे यावर्षीही निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारीसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार काका पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांच्याबरोबरच आता माजी खासदार रमेश कत्ती यांचेही नाव काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवाराच्या यादीत आल्याने बेळगाव जिल्ह्यात निपाणी विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
येथून प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार व राज्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विजयरथाला लगाम घालण्यासाठी तितकाच तुल्यबळ उमेदवार आवश्यक असल्याने त्यादृष्टीने काँग्रेस हायकमांडने पहिल्या यादीत निपाणीचे नाव जाहीर केलेले नाही. याठिकाणी उमेदवारीसाठी काका पाटील व उत्तम पाटील यांच्या मनोमिलनातून एकास एक उमेदवार देता येईल का? या दृष्टीने चाचपणी सुरू होती. मात्र त्याला यश येत नसल्याने ऐनवेळी तिसरा पर्याय म्हणून रमेश कत्ती यांचे नाव पुढे आले आहे. युवा उद्योजक रोहन साळवे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र अजूनही यावर अंतिम तोडगा निघालेला नाही.
दरम्यान निपाणीतील उमेदवारी निश्चित करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने मंगळवारी इच्छुकांसोबत बैठक आयोजित केल्याची माहिती आहे. यात उमेदवार निश्चित होतो का? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. तूर्तास भाजपने कोणावरही टीकाटिप्पणी केलेली नाही. काँग्रेस उमेदवारीच्या रेसमधून बाहेर पडणाऱ्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मदत होईल या आशेवर टीकाटिप्पणी टाळण्यात आल्याचे बोलले जात आहे. एकूणच काँग्रेस उमेदवारीसाठी सुरू असलेली जोरदार चुरस पाहता तोडगा न निघाल्यास आणखी काही दिवस येथील उमेदवारी प्रलंबित ठेवली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.