संग्राम काटकर, कोल्हापूर
कोल्हापुरातील युवा इंजिनिअर भैरव शहा-गुंदेशा या तरूणाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे काम सोपे करणारा रोबो बनवला आहे. कल्पनाशक्तीची चुणूक पहायला मिळणाऱ्या या अत्याधुनिक रोबोचे डू-ओ-ड्रील असे नाव आहे. तो इलेक्ट्रानिक्स उत्पादनातील प्रिंटेड सर्किट बोर्डवर बिनचुक होल पाडण्याचे काम करतो. या रोबोची माहिती भैरव यांनी संकेतस्थळावरून व्हायरल केली होती. ही माहिती पाहून भारतासह मलेशिया, युगांडा व रशिया (मास्को) येथील कंपन्यांनी रोबोची मागणी केली आहे.
रोबोचे निर्मितीकार भैरव शहा हे भवानी मंडप, भवानी चेंबर येथील रहिवासी आहे. पुण्यातील एमआयटी कॉलेजमधून बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांनी औद्योगिक वसाहतीची गरज लक्षात घेऊन रोबो निर्मिती करिअर करण्याचे ठरविले. सहा वर्षांपूर्वी भैरव यांनी पुण्यात सिंहगड रोडवर पार्श्वनाथ रोबोटीक्स कंपनी सुरू केली. रोबो निर्मिती सुरू केली. या रोबोपैकी डू-ओ-ड्रीला हा रोबो मात्र विशेष ठरला आहे. औद्योगिक वसाहतीत सर्किट बोर्डची निर्मिती करत असताना त्यात येणाऱ्या अडचणी ओळखून भैरव यांना ड्रिलिंग करणारा रोबो बनवण्याची कल्पना सुचली. ती सत्यात आणण्यासाठी त्यांनी 2018 साली रोबो निर्मितीला प्रारंभ केला. सर्किट बोर्डवर रोबोकडून पाडल्या जाणाऱ्या होलमधील अचुकता आणण्यासाठी त्यांनी असंख्य चाचण्या केल्या. अनेक बदलही केले. तीन वर्षांनी 2021 मध्ये अचूक होल पाडणारा रोबो बनवण्यात भैरव यांना यश आले.
रोबो अशी करतो कामे…
संगणक, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईलयासह इलेक्ट्रानिक्स वस्तूंमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्किट बोर्ड. या बोर्डला कार्यान्वित करण्याचे काम सोपे जावे म्हणून बनवलेल्या रोबोचे भैरव यांनी डू-ओ-ड्रील असे नामकरण केले. सर्किट बोर्डवर इलेक्ट्रॉनिक्स भाग बसवण्यासाठी बिनचूक अशी होल असावी लागतात. इलेक्ट्रॉनिक्सच्या भागाच्या आकारानुसार होल बिनचुकपणे पाडण्याचे काम डू-ओ-ड्रील हा रोबो करतो. एरव्ही हँडमेड काम करताना विविध प्रकारचे ड्रिल मशिन वापरावे लागतात. पण हा रोबो स्वत:च्या बुद्धिने आवश्यकतेनुसार होल पाडतो. वैशिष्ठ्या म्हणजे सर्किट बोर्डवर जो इलेक्ट्रॉनिक्स भाग बसण्यासाठी जितक्या आकाराचे होल पाहिजे तितक्याच आकारात होल पाडण्याचे काम हा रोबो करतो.
भारतासह परदेशातून रोबोला मागणी…
डू-ओ-ड्रील या रोबोसारखा अन्य दुसरा कोणताही रोबो नाही, असा भैरव यांचा दावा आहे. ते सांगतात, इलेक्ट्रानिक्स उत्पादनातील प्रिंटेड सर्किट बोर्डवर होल पाडण्याचे काम करणारा रोबो अन्य संशोधकांनी केला आहे का ? याची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून घेतली आहे. शिवाय आपल्या संकेतस्थळावर डू-ओ-ड्रील रोबोची माहिती व्हायरल केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड बनवणाऱ्या भारतातील औद्योगिक वसाहतीसह तीन देशांमधील कंपन्यांकडून रोबोला मागणी आली. यापैकी युगांडाकडून आलेल्या मागणीनुसार रोबोला तिकडे वितरीत केले आहे.
गेल्या वर्षभरात आलेल्या मागणीनुसार दिल्लीतील ग्रेटर नोएडा, गांधीनगर, राजकोट, (गुजरात), पुणे, मुंबई, बेंगळूर, कोलकाता, कोईमतूर (तमिळनाडू), उत्तरप्रदेश येथील औद्योगिक वसाहतीतील प्रिंटेड सर्किट बोर्ड निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भैरव यांनी रोबो वितरीत केले आहेत.
युगांडातील डकारमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात रोबोचा वापर
युगांडा या देशातील युर्निव्हसिटी ऑफ डकारमध्ये मी तयार केलेला रोबो विद्यार्थ्यांना सर्किट बोर्डसंदर्भातील प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जातोय, ही गोष्ट माझ्यासाठी भाग्याची आहे. काही दिवसांपूर्वी मास्को (रशिया) येथील कंपनीनेही संकेतस्थळावर माहिती पाहून रोबोची मागणी केली आहे.
भैरव शहा-गुंदेशा (रोबो निर्माता)
Previous Articleतळवडे येथे २२ रोजी ‘ब्रम्हपातकी काळभैरव’ दशावतार नाट्यप्रयोग
Next Article दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकारात वाढ
Related Posts
Add A Comment