|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नववर्षाचे जल्लोषात स्वागत 

संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्याकडून नव वर्षाच्या शुभेच्छा

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात सरत्या 2016 ला निरोप देऊन मध्यरात्री उशिरा 2017 चे सर्वत्र जल्लोषी स्वागत करण्यात आले. रात्री उशिरांपर्यंत सर्वत्र नूतन वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचा गोव्यातील नागरिकांबरोबर देशविदेशातून आलेल्या लाखो पर्यटकांनी आस्वाद घेतला.

राज्यातील जनतेने काल रात्री उशिरा 11.59 मिनिटानंतर नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नूतन वर्ष साजरे करण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरामधून देखील मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यात पोहोचले होते. राज्यातील सर्व हॉटेल्स पर्यटकांनी खचाखच भरलेली होती. रस्त्यावरील वाहतुकीचा ताण देखील शनिवारी प्रचंड वाढला होता. रात्री उशिरा अनेक ठिकाणी नृत्य रजनींसह इतरही करमणुकीचे कार्यक्रम तसेच मेजवान्या आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षी विदेशी पर्यटक प्रामुख्याने किनारी भागातच राहिले. मोठय़ा प्रमाणात चार्टर विमानांनी विदेशी पर्यटक गोव्यात आलेले आहेत. अनेक महनीय व्यक्ती, चित्रपट अभिनेते हे देखील पंचतारांकीत हॉटेलवर वास्तव्य करून होते. रात्री 11.59 मिनिटांनी नृत्य रजनींच्या कार्यक्रमात वीज दिवे बंद करण्यात आले आणि त्यानंतर अवघ्या 50 सेकंदात पुन्हा दिवे चालू करून नववर्ष साजरे करण्यात आले.

त्यानंतर राज्यात सर्वत्र फटाके आणि दारुकामाची आतषबाजी करण्यात येऊन विदेशी पर्यटकांनी नूतन वर्ष साजरे केले. चर्चमध्ये देखील प्रार्थना झाल्या. मध्यरात्री चर्चच्या घंटांचा नाद सुरू झाला आणि प्रिस्टनी नूतन वर्षाची घोषणा केली.

 संरक्षणमंत्र्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या असून हे नूतन वर्ष म्हणजेच निवडणूक वर्ष असून सर्व जनतेच्या हाती गोमंतकाचे भवितव्य अवलंबून आहे. यावर्षात राज्यातील जनता भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून देऊन या राज्याला पुन्हा एकदा स्थीर प्रशासन, स्थीर सरकार आणि गोव्याचा सर्वांगीण विकास त्यामुळे होईल आणि जनता गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने केलेल्या कामाची पोचपावती देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, सर्व काही जनतेच्या विश्वासावरच चालते. हे नूतन वर्ष गोव्यासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल ठरेल आणि राज्यातील जनतेला सुख, समृद्धी प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.