काश्मीरमधील बांदिपोरामध्ये कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईदरम्यान दहशतवाद्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. त्याच्याकडून चार पिस्तुले आणि अनेक गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याविऊद्ध पेठकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बांदिपोरा पोलिसांनी सांगितले. सध्या तपास सुरू असून प्रकरणाची सविस्तर माहिती लवकरच जारी केली जाईल, असे सांगण्यात आले. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सदर हस्तक कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते यासंबंधीची माहिती त्यांच्या जबानीतूनच स्पष्ट होणार आहे. सध्या सुरक्षा दलाकडून यासंबंधीची माहिती देण्यात आलेली नाही.
यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या शोपियान पोलिसांनी शनिवारी वाहन तपासणीदरम्यान दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून संशयास्पद साहित्यही जप्त केले होते. पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि विशेष कृती दलाच्या जवानांकडून शोधमोहीम राबवली जात असतानाच अशाप्रकारच्या कारवायांना वेग आला आहे. दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून अशा कारवाया केल्या जात आहेत.